
सोलापूर, 21 मे, (हिं.स.)। सोलापूरच्या शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील महिन्यापर्यंत सुमारे १६ कोटी रुपये खर्चाची अत्याधुनिक एमआरआय मशीन बसविण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी दिली. या सुविधेमुळे जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एमआरआय तपासणीसाठी आतापर्यंत अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता. मात्र सिव्हिल हॉस्पिटलमध्येच ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांना कमी खर्चात अत्याधुनिक तपासणीची सुविधा मिळणार आहे. रुग्णसेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शासकीय स्तरावर विविध सुविधा वाढविण्याचे काम सुरू असून एमआरआय मशीन हा त्यातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे डॉ. जयकर यांनी सांगितले. या मशीनमुळे मेंदू, मणका, सांधे तसेच विविध अंतर्गत आजारांचे अचूक निदान करण्यास मदत होणार असून सोलापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांनाही याचा लाभ मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड