सोलापूर महापालिकेच्या पार्कमधील अंडरग्राऊंड वायर चोरीने खळबळ
सोलापूर, 21 मे (हिं.स.)। शांती चौक परिसरातील शासकीय तंत्रनिकेतनजवळ महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या अर्बन स्ट्रीट पार्कमधून तब्बल ४९०० फूट अंडरग्राऊंड वायर चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पार्कच्या देखभाल
smc


सोलापूर, 21 मे (हिं.स.)।

शांती चौक परिसरातील शासकीय तंत्रनिकेतनजवळ महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या अर्बन स्ट्रीट पार्कमधून तब्बल ४९०० फूट अंडरग्राऊंड वायर चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पार्कच्या देखभालीसाठी दोन कर्मचारी नियुक्त असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात तेथे कोणीही उपस्थित नसल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत सुमारे पावणेदोन कोटी रुपये खर्च करून हे स्ट्रीट पार्क उभारण्यात आले होते. पार्कमध्ये आकर्षक डेकोरेशन पोल आणि अंडरग्राऊंड वायरिंगद्वारे लाईटिंग व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर उजळून निघत होता. मात्र, नियमित देखभालीअभावी काहीच दिवसांत या प्रकल्पाची दुरवस्था होऊ लागली.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पार्कमधील लाईट बंद असल्याची ऑनलाइन तक्रार एका नागरिकाने महापालिकेकडे केली होती. त्यानंतर संबंधित विभागीय कार्यालयाकडे तक्रार पाठवण्यात आली.

१६ मे रोजी विभागीय कार्यालयाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला तांत्रिक बिघाडाची शक्यता तपासण्यात आली. मात्र एका पोलवरून दुसऱ्या पोलपर्यंत वीजपुरवठा होत नसल्याचे आढळले. तपासादरम्यान अंडरग्राऊंड वायरच गायब असल्याचे स्पष्ट झाले. संपूर्ण पार्कमधील वायर चोरीला गेल्याचे पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला.

या प्रकरणी महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पूजा देशमाने यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस हवालदार धनाजी बाबर या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande