माजी खासदार गंगाधरपंत कुचन, कवी माधव पवार यांना सभागृहाची आदरांजली
सोलापूर, 21 मे (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित सर्वसाधारण सभेच्या प्रारंभी विविध क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजली प्रस्तावानंतर सभागृहातील वातावरण शोकमय झाले असून पुढील कामकाजासाठी
gfd


सोलापूर, 21 मे (हिं.स.)।

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित सर्वसाधारण सभेच्या प्रारंभी विविध क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजली प्रस्तावानंतर सभागृहातील वातावरण शोकमय झाले असून पुढील कामकाजासाठी सभा तहकूब करण्यात आली.

महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राजकीय, सामाजिक, साहित्यिक, वैद्यकीय आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले. उपस्थित सदस्यांनी दिवंगतांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या योगदानाचे स्मरण केले.

सभागृहात माजी खासदार गंगाधरपंत कुचन, ज्येष्ठ कवी व संगीतकार माधव रामचंद्र पवार, गायक-संगीतकार गोविंद पोवळे, ज्येष्ठ तेलगू अभिनेते भरत कांत, सांगोला मतदारसंघातील आमदारांचे वडील पोपट गणपतराव देशमुख तसेच ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने दिवंगतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्यात आल्या. “ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,” अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

यानंतर सभागृहातील सर्व सदस्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून मौन पाळत दिवंगतांना आदरांजली अर्पण केली. श्रद्धांजलीचा प्रस्ताव एकमुखाने मंजूर झाल्यानंतर आजची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande