
सोलापूर, 21 मे, (हिं.स.)। अधिक मासानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी होत असून भाविकांना जलद आणि सुलभ पद्धतीने पदस्पर्श दर्शन मिळावे यासाठी मंदिर समितीने १५ जूनपर्यंत व्हीआयपी दर्शनावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या अधिक मासाला सुरुवात झाली आहे. या काळात चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यासह देशभरातून भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल होत आहेत. सध्या दररोज सुमारे लाखभर भाविक दर्शनासाठी येत असून वाढत्या गर्दीमुळे दर्शनरांग गोपाळपूर येथील पत्राशेडपर्यंत पोहोचली आहे. मुखदर्शनासाठीही मोठ्या रांगा लागत आहेत.
भाविकांना दर्शनासाठी पाच ते सहा तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने सर्वसामान्य भक्तांना वेळेत दर्शन मिळावे, यासाठी व्हीआयपी दर्शन मर्यादित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर समितीने स्पष्ट केले.
दरम्यान, पंढरपुरात उष्णतेचा पारा ४२ अंशांपर्यंत गेल्याने उकाडा वाढला आहे. भाविकांना उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी मंदिर समितीने दर्शन रांगेत विविध ठिकाणी स्प्रिंकलर आणि पाणी फवारणी यंत्रणा बसविली आहे. त्यामुळे रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना काहीसा थंडावा मिळत आहे.
तसेच भाविकांसाठी थंड पिण्याचे पाणी, सरबत आणि इतर आवश्यक सुविधांचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीने दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड