सुरत-अमरावती एक्स्प्रेसमध्ये २८ मेपासून मोठा बदल
जळगाव, 21 मे (हिं.स.)खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगाव, भुसावळ आणि धुळे जिल्ह्यातील हजारो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या गाडी क्रमांक २०९२५/२६ सुरत–अमरावती एक्स्
सुरत-अमरावती एक्स्प्रेसमध्ये २८ मेपासून मोठा बदल


जळगाव, 21 मे (हिं.स.)खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगाव, भुसावळ आणि धुळे जिल्ह्यातील हजारो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या गाडी क्रमांक २०९२५/२६ सुरत–अमरावती एक्स्प्रेसचे अत्याधुनिक एलएचबी (LHB) कोचमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. येत्या २८ मे २०२६ पासून ही गाडी संपूर्णपणे नव्या रॅकसह ट्रॅकवर धावणार आहे.नव्या रचनेनुसार २०९२५/२६ सुरत–अमरावती एक्स्प्रेसमध्ये १ एसी चेयर कार, ४ सेकंड सिटिंग चेयर कार, २ स्लीपर कोच, ७ जनरल कोच, १ एसएलआर आणि १ जनरेटर कोचचा समावेश असणार आहे. खान्देशातील शिंदखेडा, धरणगाव, जळगाव आणि भुसावळ परिसरातील हजारो नागरिक नियमितपणे सुरत, नंदुरबार, अकोला आणि अमरावतीकडे प्रवास करतात. यामध्ये सुरतच्या उद्योगजगतात काम करणारे खान्देशातील कामगार, व्यापारी, शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैद्यकीय उपचारांसाठी ये-जा करणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.२८ मेपासून होणाऱ्या या आधुनिक बदलामुळे या सर्व घटकांना आता कमी खर्चात अधिक सुरक्षित आणि वेगवान प्रवासाचा आनंद घेता येणार असल्याने, खान्देशातील प्रवासी संघटना आणि नागरिकांमधून या निर्णयाचे जोरदार स्वागत केले जात आहे. डीआरयूसीसी सदस्य महेंद्र कोठारी तसेच धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने पश्चिम रेल्वे प्रशासन आणि खासदार स्मिता वाघ यांचे आभार मानले आहेत. भविष्यात खान्देशातील प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन अधिक गाड्या, अतिरिक्त थांबे, नवीन एक्स्प्रेस सेवा तसेच आधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षाही प्रवासी संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande