लातूर पोलीस दलातील ३१५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या
लातूर, 21 मे (हिं.स.)। लातूर जिल्हा पोलीस दलात पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या अडचणी, कौटुंबिक परिस्थिती, सेवा कालावधी आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन तब्बल ३१५ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्
पोलीस बदली


लातूर, 21 मे (हिं.स.)।

लातूर जिल्हा पोलीस दलात पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या अडचणी, कौटुंबिक परिस्थिती, सेवा कालावधी आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन तब्बल ३१५ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, संवेदनशील आणि सकारात्मक पद्धतीने राबविण्यात आल्याने पोलीस दलात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बदली प्रक्रिया पार पडली. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस अंमलदार अशा विविध पदांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सध्याच्या पोलीस ठाणे किंवा शाखेमध्ये पाच वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केली होती. शासन निर्णय व परिपत्रकातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार या बदल्या करण्यात आल्या.

आस्थापना मंडळाच्या बैठकीत प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाभिलेखाचा सखोल अभ्यास करण्यात आला. यामध्ये रिक्त पदे, कार्यक्षमता, कौटुंबिक अडचणी, आरोग्य विषयक बाबी, मुलांचे शिक्षण, प्रवासातील गैरसोय तसेच वैयक्तिक समस्या यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आला.

विशेष म्हणजे, बदल्यांपूर्वी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह समक्ष बोलावून त्यांची बाजू ऐकून घेण्यात आली. त्यानंतर आस्थापना मंडळाच्या शिफारशींवर अंतिम निर्णय घेत बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले.

या प्रक्रियेमुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित अडचणी दूर होण्यास मदत झाली असून, पसंतीच्या पोलीस ठाणे किंवा शाखेत बदली मिळाल्याने पोलीस दलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी अधिक सकारात्मक ऊर्जा आणि जबाबदारीने काम करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande