उजनी धरण चिंताजनक स्थितीकडे; दररोज पाणीसाठ्यात घट
सोलापूर, 21 मे, (हिं.स.)। कडक उन्हाळा, धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि वाढते बाष्पीभवन यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने घट होत आहे. आज सकाळी ६ वाजेच्या आकडेवारीनुसार धरणातील पाणीपातळी उणे १५.२२ टक्क्यांवर म्हणजेच उणे ८.१५ टीएमसीपर्यंत खाली
ujani dam news


सोलापूर, 21 मे, (हिं.स.)। कडक उन्हाळा, धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि वाढते बाष्पीभवन यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने घट होत आहे. आज सकाळी ६ वाजेच्या आकडेवारीनुसार धरणातील पाणीपातळी उणे १५.२२ टक्क्यांवर म्हणजेच उणे ८.१५ टीएमसीपर्यंत खाली गेली आहे. सध्या धरणात ५५.५० टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

गेल्या वर्षी मे ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा, सीना आणि अन्य नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती. त्या काळात सुमारे २५० टीएमसी पाणी भीमा नदीतून वाहून गेले होते. मात्र त्यानंतरही उन्हाळ्याच्या अखेरीस जिल्ह्यात काही भागांमध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

जानेवारीअखेर उजनी धरण शंभर टक्के भरलेले होते. मात्र अवघ्या चार महिन्यांत १२१ टीएमसी क्षमतेच्या या धरणातील साठा निम्म्यावर आला असून बुधवारी तो ५५ टीएमसीपर्यंत खाली घसरला आहे.

गेल्या वर्षी याच दिवशी उजनी धरणाची पाणीपातळी उणे २३ टक्के होती. यंदाही पातळी त्याच दिशेने जात असून सध्याची मायनस पातळी साडे पंधरा टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

सध्या धरणातून शेतीसाठी कॅनलद्वारे २१५३ क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. त्यासोबतच वाढते बाष्पीभवन यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्यात घट होत असल्याचे चित्र आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande