रत्नागिरी : झाडगाव एमआयडीसीतील अनधिकृत बांधकामे २८ मे रोजी तोडणार
रत्नागिरी, 21 मे (हिं.स.) । रत्नागिरीजवळील झाडगाव एमआयडीसी परिसरातील अनधिकृत बांधकामे येत्या २८ मे रोजी तोडण्यात येणार आहेत. या परिसरातील सुमारे ५० बेकायदेशीर बांधकामधारकांना एमआयडीसी प्रशासनाने अंतिम नोटिसा बजावल्या असून येत्या २८ मे रोजी ही सर्व
रत्नागिरी : झाडगाव एमआयडीसीतील अनधिकृत बांधकामे २८ मे रोजी तोडणार


रत्नागिरी, 21 मे (हिं.स.) । रत्नागिरीजवळील झाडगाव एमआयडीसी परिसरातील अनधिकृत बांधकामे येत्या २८ मे रोजी तोडण्यात येणार आहेत.

या परिसरातील सुमारे ५० बेकायदेशीर बांधकामधारकांना एमआयडीसी प्रशासनाने अंतिम नोटिसा बजावल्या असून येत्या २८ मे रोजी ही सर्व अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात येणार आहेत.

संभाव्य कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने न्यायालयात कॅव्हेटदेखील दाखल केले आहे. झाडगाव एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर विजेची अनधिकृत कनेक्शन्स घेऊन तसेच बेकायदेशीर वीजजोडण्या करून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे करण्यात आली आहेत. यापूर्वी दोन वेळा अशा नोटिसा देऊनही संबंधितांनी अतिक्रमणे न हटवल्यामुळे प्रशासनाने आता थेट अंतिम नोटीस बजावून सर्वांना सात दिवसांची मुदत दिली आहे.

२८ मे रोजी होणाऱ्या या धडक मोहिमेदरम्यान पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार असून त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी करणारे पत्र एमआयडीसीकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, एमआयडीसीचे कर्मचारी या परिसरात नोटिसा बजावण्यासाठी गेले होते, तेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी त्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून या नोटिसा घ्याव्यात अशी मागणी करत संबंधितांनी कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा केल्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाने आपली भूमिका ठाम ठेवत पोलिसांच्या उपस्थितीत ही नोटीस वितरण प्रक्रिया पूर्ण केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande