ठाण्यातील भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू; पालिकेकडून मदतीची घोषणा
ठाणे, 21 मे, (हिं.स.)। गावदेवी भाजी मंडई येथे आज पहाटे साडेतीनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ठाणे महापालिकेचे सुरक्षा रक्षक व अग्निशमन विभागातील जवानांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या
ठाण्यातील भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू; पालिकेकडून मदतीची घोषणा


ठाणे, 21 मे, (हिं.स.)। गावदेवी भाजी मंडई येथे आज पहाटे साडेतीनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ठाणे महापालिकेचे सुरक्षा रक्षक व अग्निशमन विभागातील जवानांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापौर शर्मिला पिंपळोलकर, खासदार नरेश म्हस्के व आयुक्त सौरभ राव यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत दुर्घटनेत मृत्यूमुखी झालेले सुरक्षा रक्षक काळू शंकर गाडेकर (वय 55) व अग्निशमन दलातील स्थानक अधिकारी सागर सुर्यकांत शिंदे (42) यांपतच्या कुटुंबियांना 10 लाखांची तर जखमी झालेले सुजित पष्टे (45), समीर जाधव (40) यांच्या कुटुंबियांना 1 लाखांची तातडीची मदत तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासकीय नियमानुसार अनुकंपा तत्त्वावर महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचा व मंडईतील 155 गाळेधारकांचे 1 जून पर्यत त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचा सर्वानुमते निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, सर्वपक्षीय गटनेते पवन कदम, मुकेश मोकाशी, अभिजीत पवार यांच्यासह स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, नगरसेव‍िका प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, नगरसेवक सुधीर कोकाटे, संजय भोईर रमाकांत मढवी, योगेश जानकर, नम्रता कोळी, अनिल भोर आदी उपस्थित होते.

या घटनेत जखमी झालेले सुजीत पाटे व समीर जाधव या दोघांनाही उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेत मृत झालेले सुरक्षा रक्षक काळू शंकर गाडेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. तर स्थानक अधिकारी सागर शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन महिन्यांची मुलगी असा परिवार आहे.

गांवदेवी भाजी मार्केट येथील 155 गाळेधारक बाधित झाले असून या गाळेधारकांचे त्याच ठिकाणी 1 जून 2026 रोजी स्थलांतर करण्यात येईल. सद्यस्थ‍ितीत गांवदेवी भाजी मंडई येथे साफसफाईचे काम सुरू असून त्यानंतर या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट तसेच फायर ऑडिट करण्यात येईल. रंगरंगोटी व विद्युतची सर्व कामे पुर्ण झाल्यानंतर या गाळेधारकांचे त्याच ठिकाणी स्थलांतर करणे, अशा घटना पुन्हा घडू नये या दृष्टीने उपाययोजना करणे, तसेच आपत्कालीन, अग्न‍िशमन विभाग या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विमा संरक्षणाच्या रकमेत वाढ करणे आदी निर्णयही आज झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आले. तसेच नुकसान झालेल्या ठिकाणचे पंचनामे करुन जे काही नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई देण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी भाजी विक्रेत्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे देखील पदाधिकारी व आयुक्तांनी ऐकून घेतले. या ठिकाणी असलेल्या विक्रेत्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी महापालिका आवश्यक ते सहकार्य करेल तसेच त्यांचे तात्पुरते स्थलांतर न करता 1 जून रोजी त्याच ठिकाणी स्थलांतर महापालिका करेल असे सांगण्यात आले. याबाबत भाजी विक्रेत्यांनी सकारात्मकता दर्शविली.

उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त सौरभ यांचेशी चर्चा करुन या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. यावेळी मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळणेसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच राज्यशासनाच्या आपत्कालीन विभागामार्फत मदत मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच भाजी मंडईतील गाळेधारकांचे स्थलांतर करण्याबाबतची चर्चाही उपमुख्यमंत्र्यांनी आयुक्तांसमवेत केली.

फायर स्टेशन शहरात हलविण्यात यावे

गांवदेवी भाजी मंडईत गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यापूर्वी या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा बसविण्यात यावी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे उभ्या राहतील या दृष्टीने नियोजन करावे असे सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी नमूद केले. याबाबत दोन ते तीन दिवसात निर्णय घेण्यात येईल असे आयुक्तांनी नमूद केले.

सदर बैठकीस उपनगर अभ‍ियंता शुभांगी केसवाणी, सहायक आयुक्त महेशकुमार जामनोर, राजेश सोनावणे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, ऋषीकेश जवळकर आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande