अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील ॲक्शन मोडवर
लातूर, 22 मे (हिं.स.) अहमदपूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, गरीब घरकुल आणि विहीर लाभार्थ्यांना प्रशासकीय स्तरावर कुठलाही त्रास होणार नाही याची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख दक्षता घ्यावी, अशा कडक सूचना अहमदपूर पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष सभापती सुरज
सुरज पाटील


लातूर, 22 मे (हिं.स.) अहमदपूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, गरीब घरकुल आणि विहीर लाभार्थ्यांना प्रशासकीय स्तरावर कुठलाही त्रास होणार नाही याची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख दक्षता घ्यावी, अशा कडक सूचना अहमदपूर पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष सभापती सुरज बाबासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत. तालुक्यातील एका वयोवृद्ध नागरिकाचा घरकुला संदर्भातला व्हिडिओ समाज माध्यमांवर आणि विविध वृत्तवाहिन्यांवर प्रसारित होताच, त्याची अत्यंत गंभीर दखल घेत सभापती सुरज पाटील यांनी तात्काळ पंचायत समितीमध्ये घरकुल व विहीर विभागाची विशेष आढावा बैठक बोलावली. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या सभापतींच्या या तत्परतेमुळे तालुक्यात त्यांच्या संवेदनशील आणि जनहितैषी नेतृत्वाचे मोठे कौतुक होत आहे. या बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दांत बजावले की, कुठल्याही गरीब लाभार्थ्याला त्याच्या हक्काच्या बिलासाठी पंचायत समितीच्या पायऱ्या झिजवाव्या लागू नयेत, प्रशासनाने स्वतःहून पुढे होऊन सर्वसामान्यांची कामे केली पाहिजेत.

या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत सभापती सुरज पाटील यांनी अत्यंत बारकाईने गावनिहाय घरकुल आणि विहीर योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. मागील दोन वर्षांतील पूर्ण झालेल्या, अपूर्ण असलेल्या तसेच सध्या प्रगतीपथावर असणाऱ्या सर्व कामांची त्यांनी सखोल माहिती घेतली. तालुक्यातील प्रलंबित असलेली सर्व घरकुल व विहिरींची कामे आगामी ३१ मे २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाली पाहिजेत, अशा कडक सूचना त्यांनी दिल्या. यासोबतच लाभार्थ्यांची अडवणूक थांबावी यासाठी कामांच्या मस्टरची तात्काळ मागणी करून ते पूर्ण करून घेण्याचे आणि लाभार्थ्यांचे हप्ते थेट त्यांच्या खात्यावर वेळेवर जमा करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. सर्वसामान्यांच्या हक्काच्या योजनांमध्ये चालढकल खपवून घेतली जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत सभापती सुरज पाटील यांनी इशारा दिला की, येणाऱ्या काळात घरकुलाच्या किंवा विहिरीच्या कामात कोणत्याही कर्मचाऱ्याने निष्काळजीपणा केल्याचे आढळल्यास, त्या कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही आणि त्याला थेट घरी पाठवले जाईल.

सभापती सुरज पाटील यांच्या या आक्रमक आणि थेट भूमिकेमुळे पंचायत समिती वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रशासकीय कामांना आता गती मिळणार आहे. या बैठकीस सामाजिक वनीकरण अधिकारी श्रीमती गीते मॅडम, गटविकास अधिकारी पंकज शेळके, घरकुल विभागाचे सर्व कनिष्ठ अभियंता, रोजगार सेवक, तालुका डाटा ऑपरेटर यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी कसा असावा, याचे उत्तम उदाहरण सभापती सुरज पाटील यांनी आपल्या तडफदार कार्यपद्धतीने पुन्हा एकदा दाखवून दिले असून, त्यांच्या या लोकहितकारी निर्णयाचे संपूर्ण अहमदपूर तालुक्यातून उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande