अकरावी प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी होणारा गोंधळ थांबवा – ॲड. अमोल मातेले
मुंबई, 22 मे (हिं.स.)। अकरावीच्या केंद्रीकृत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी होत असलेल्या तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा गंभीर मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्र
अकरावी प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी होणारा गोंधळ थांबवा – ॲड. अमोल मातेले


मुंबई, 22 मे (हिं.स.)। अकरावीच्या केंद्रीकृत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी होत असलेल्या तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा गंभीर मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाचे आयुक्त यांना ईमेलद्वारे सविस्तर पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होताच दरवर्षी संकेतस्थळ कोलमडणे, तांत्रिक अडचणी निर्माण होणे, नोंदणी प्रक्रियेत अडथळे येणे आणि विद्यार्थ्यांना वारंवार प्रतीक्षा करावी लागणे हे जणू नियमित झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण होत आहे.

यासंदर्भात ॲड. अमोल मातेले यांनी पुढील मुद्दे उपस्थित केले आहेत.

दहावीचा निकाल वेळेत लागतो, मात्र अकरावी प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी विलंब का होतो, याचे स्पष्ट उत्तर शिक्षण विभागाने द्यावे. प्रत्येक वर्षी ‘तांत्रिक अडचणी’ हेच कारण पुढे केले जाते. जर समस्या सातत्याने निर्माण होत असतील, तर त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही?प्रवेश प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थी आणि पालकांना तासन्तास संकेतस्थळावर थांबावे लागत असून, मानसिक तणाव आणि भविष्याबाबत असुरक्षितता वाढत आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की प्रवेश प्रक्रियेच्या अनिश्चिततेमध्ये अडकून राहायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण परिस्थितीमुळे अनेकांच्या मनात शंका निर्माण होत आहेत की, प्रवेश प्रक्रियेला होणारा विलंब हा अप्रत्यक्षपणे कोचिंग क्लासेसना लाभदायक ठरत आहे का? विद्यार्थ्यांचे भविष्य आणि पालकांची मानसिक अवस्था ही कोणत्याही प्रशासनिक निष्काळजीपणाचा बळी ठरू नये.

यावेळी ॲड. अमोल मातेले यांनी उपरोधिक शब्दांत म्हटले की, “दरवर्षी अकरावी प्रवेश प्रक्रियेबरोबर ‘तांत्रिक अडचणींचा नवीन सीझन’ सुरू होतो. विद्यार्थ्यांचे भविष्य ‘लोडिंग’मध्ये ठेवण्याचे काम प्रशासनाने थांबवले पाहिजे.”

तसेच त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “यावर्षीही प्रवेश प्रक्रियेमध्ये असाच गोंधळ निर्माण करून विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न झाला, तर संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे भविष्य कोणाच्याही निष्काळजीपणामुळे अडवले जाऊ देणार नाही.”शिक्षण विभागाने तातडीने तांत्रिक यंत्रणा सक्षम करून प्रवेश प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि वेळेत पूर्ण करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande