काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक तरुणीचा जीव वाचला
रायगड, 22 मे (हिं.स.)। बीच काशीद येथे समुद्रात बुडणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश आले असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या “रोबोटिक बोयो” या आधुनिक जीवरक्षक यंत्राची उपयुक्तता पुन्हा एक
A-young-tourist-girls-life-wa


रायगड, 22 मे (हिं.स.)। बीच काशीद येथे समुद्रात बुडणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश आले असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या “रोबोटिक बोयो” या आधुनिक जीवरक्षक यंत्राची उपयुक्तता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पोलिसांच्या तत्परता आणि प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील आकाश साबळे आणि सिद्धी साबळे हे आपल्या कुटुंबासह उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी काशीद समुद्रकिनाऱ्यावर आले होते. आज सकाळी सुमारे ७.४० वाजण्याच्या सुमारास हे कुटुंब समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने सिद्धी साबळे (वय २०) ही तरुणी अचानक खोल पाण्याकडे ओढली जाऊ लागली आणि बुडण्याची वेळ तिच्यावर आली.

घटनेची माहिती मिळताच कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई प्रविण रोटकर आणि जितेंद्र माने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या “रोबोटिक बोयो” या रिमोट ऑपरेटेड वॉटरक्राफ्टच्या सहाय्याने समुद्रात वेगाने प्रवेश केला. काही क्षणांतच त्यांनी बुडणाऱ्या सिद्धी साबळे हिला सुरक्षित बाहेर काढले.

या धाडसी बचावकार्यानंतर पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे, जिल्हा प्रशासनाचे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कौतुक केले. “रोबोटिक बोयो” या आधुनिक यंत्रामुळे किनारपट्टी भागातील बचावकार्य अधिक प्रभावी आणि जलद होत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अशा अत्याधुनिक यंत्रणांची गरज असल्याचेही यानिमित्ताने अधोरेखित झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande