
लातूर , २२ मे (हिं.स.) : अहमदपूर तालुक्यातील घरकुल आणि विहीर योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासकीय स्तरावर कोणताही त्रास होऊ नये, यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, अशा कडक सूचना सुरज बाबासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत.
तालुक्यातील एका वयोवृद्ध नागरिकाचा घरकुल योजनेशी संबंधित व्हिडिओ समाजमाध्यमांवर आणि वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्यानंतर सभापती सुरज पाटील यांनी तत्काळ पंचायत समितीत घरकुल व विहीर विभागाची विशेष आढावा बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी प्रशासनाला लाभार्थ्यांच्या कामांमध्ये विलंब किंवा अडथळे होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले.
बैठकीदरम्यान गावनिहाय घरकुल व विहीर योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मागील दोन वर्षांतील पूर्ण, अपूर्ण आणि सुरू असलेल्या कामांची माहिती घेऊन प्रलंबित सर्व कामे ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
सभापती पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, गरीब लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या बिलासाठी पंचायत समितीच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत. कामांचे मस्टर तातडीने पूर्ण करून लाभार्थ्यांचे हप्ते वेळेत थेट बँक खात्यात जमा करण्यात यावेत, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी त्यांनी इशारा देताना सांगितले की, घरकुल किंवा विहीर योजनांच्या अंमलबजावणीत कोणत्याही कर्मचाऱ्याकडून निष्काळजीपणा झाल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
या बैठकीस सामाजिक वनीकरण अधिकारी श्रीमती गीते, गटविकास अधिकारी पंकज शेळके, घरकुल विभागाचे कनिष्ठ अभियंते, रोजगार सेवक, तालुका डाटा ऑपरेटर तसेच पंचायत समितीचे विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सभापती सुरज पाटील यांच्या या भूमिकेमुळे पंचायत समिती प्रशासनात खळबळ उडाली असून, तालुक्यातील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis