अमरावती परिक्षेत्रीय पोलीस विभागाची फॉरेन्सिक्स कार्यशाळा संपन्न
वैज्ञानिक तपास पद्धतींवर भर; २६० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग अमरावती, 22 मे (हिं.स.)। अमरावती परिक्षेत्रीय पोलीस विभागाच्या वतीने विद्याभारती महाविद्यालय, अमरावती येथे “फॉरेन्सिक्स कार्यशाळा” आयोजित करण्यात आली. गुन्ह्यांमधील दोषसिद्धीचे प्
अमरावती परिक्षेत्रीय पोलीस विभागाची फॉरेन्सिक्स कार्यशाळा संपन्न


वैज्ञानिक तपास पद्धतींवर भर; २६० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

अमरावती, 22 मे (हिं.स.)।

अमरावती परिक्षेत्रीय पोलीस विभागाच्या वतीने विद्याभारती महाविद्यालय, अमरावती येथे “फॉरेन्सिक्स कार्यशाळा” आयोजित करण्यात आली. गुन्ह्यांमधील दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणे, तपास अधिकाऱ्यांना वैज्ञानिक तपास पद्धतींबाबत प्रशिक्षित करणे आणि आधुनिक फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.कार्यशाळेमध्ये फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या विविध विभागांची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये डीएनए विश्लेषण, सायबर फॉरेन्सिक्स, दस्तऐवज परीक्षण, बॅलिस्टिक, नार्कोटिक्स आणि केमिकल अॅनालिसिस यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता सायबर फॉरेन्सिक्सचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मोबाईल फोन, सोशल मीडिया, डिजिटल व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज, ई-मेल आणि आयपी लॉग्स यांसारख्या डिजिटल पुराव्यांचे संकलन, जतन आणि विश्लेषण यामध्ये सायबर फॉरेन्सिक्स विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे वक्त्यांनी सांगितले.कार्यशाळेत वैज्ञानिक पुरावे न्यायालयीन प्रक्रियेत अत्यंत विश्वासार्ह मानले जात असल्याने तपास अधिकाऱ्यांनी पुरावे योग्य पद्धतीने संकलित करून त्यांचे वैज्ञानिक विश्लेषण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामुळे गुन्हेगारांविरोधात भक्कम पुरावे उभे राहून दोषसिद्धीचा दर वाढण्यास मदत होते, तसेच निष्पाप व्यक्तींना न्याय मिळवून देण्यातही फॉरेन्सिक विज्ञानाची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगण्यात आले.या कार्यशाळेत अमरावती परिक्षेत्रातील अमरावती ग्रामीण, वाशिम, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा पोलीस घटकांतील सुमारे २६० वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनवर कार्यरत अधिकारीही उपस्थित होते.

ही कार्यशाळा विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. विजय ठाकरे, सहायक संचालक निलेश पाटील, उपसंचालक वैषाली महाजन आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande