
सोलापूर, 22 मे (हिं.स.)।
आषाढी एकादशी यात्रा यंदा 25 जुलै 2026 रोजी पार पडणार असून यात्रा शांततेत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले.नियोजन भवन येथे आयोजित आषाढी वारी 2026 नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले की, पालखी मार्ग तसेच विसावा आणि मुक्काम स्थळी सुविधा उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या कामांची यादी संबंधित विभागांनी 23 मे 2026 पर्यंत प्रशासनाकडे सादर करावी. त्यानंतर विधान परिषद निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर या कामांना सवलत मिळावी यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.वारीदरम्यान विविध कामांसाठी निधी आवश्यक असलेल्या विभागांनी जिल्हा नियोजन समितीकडे तातडीने प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. आषाढी वारी ही कुंभमेळ्यानंतरची सर्वात मोठी यात्रा असल्याने प्रत्येक यंत्रणेने जबाबदारीचे काटेकोर नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावर्षी राज्यभरातून सुमारे 5400 एसटी बसची व्यवस्था करण्यात आली असून सर्व बसची तपासणी करून त्या मार्गात बंद पडणार नाहीत याची खात्री करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. पंढरपूर शहरात तात्पुरते बसस्थानक उभारून मोबाईल टॉयलेट आणि स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.अन्न व औषध प्रशासनाने शहरातील हॉटेल्स, किराणा दुकाने आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी वाढवून अन्नसुरक्षा सुनिश्चित करावी, तर पाटबंधारे विभागाने वारी कालावधीत भीमा नदीपात्रात आवश्यक पाणी सोडण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड