
पुणे, 22 मे (हिं.स.)।
बारामती येथे पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत आंतरराज्य गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत तब्बल ६३४ किलो गांजा, दोन चारचाकी वाहने आणि इतर साहित्य असा सुमारे तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान जळोची परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला.
या प्रकरणात प्रकाश उर्फ पक्या मोहन काटे, समाधान धर्मराज गायकवाड, प्रिन्सकुमार मुन्ना सिंह, राहुल कल्याण गोरे, विकी उर्फ पप्पू कांबळे, संग्राम उर्फ चंदन सिंह आणि जॉकी माझी यांचा समावेश आहे.
तपासात आरोपी छत्तीसगडमधून गांजा आणून पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत त्याची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु