
रायगड, 22 मे (हिं.स.)। राज्यातील ग्रामीण भागातील पशुपालन व्यवसायाला आधुनिक उद्योजकतेची जोड देणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक काम पूर्ण होताच इच्छुक लाभार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त किरण पाटील यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणे, पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देणे आणि युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे ग्रामीण उद्योजकतेला नवे बळ मिळणार असून राज्याच्या आर्थिक विकासातही महत्त्वाचे योगदान मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि वेळेत व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. लाभार्थ्यांना घरबसल्या अर्ज करता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या पोर्टलच्या निर्मितीचे काम महाआयटीकडे सोपविण्यात आले असून तांत्रिक टीम युद्धपातळीवर काम करत आहे.
महाडीबीटी पोर्टलचे काम पूर्ण होताच योजना अधिकृतपणे सुरू झाल्याची सूचना पशुसंवर्धन विभागामार्फत जाहीर करण्यात येणार असल्याचे डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. राज्यातील शेतकरी, पशुपालक आणि युवकांमध्ये या योजनेबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेविषयी अधिकृत माहिती, मार्गदर्शन किंवा शंका निरसनासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी १९६२ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जवळच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधूनही माहिती घेता येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)