
रत्नागिरी, 22 मे (हिं.स.) । लोवले मयूरबाग (ता. संगमेश्वर) येथून अचानक बेपत्ता झालेला १२ वर्षांचा यश संतोष पडये हा मुलगा मुंबईत सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले आहे. आई-वडील रागावल्याच्या कारणावरून तो कोणालाही न सांगता रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे पोलीस तपासात सिद्ध झाले.
संतोष काशिराम पडये यांचा मुलगा यश (इयत्ता सहावी) गेल्या ११ मे २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र यशचा पत्ता लागलाi नाही. ग्रामीण भागातून एकाएकी निष्पाप बालक गायब झाल्याने त्याचे अपहरण झाले असावे, असा संशय व्यक्त केला जात होता. त्यावरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांसमोरही या बालकाला शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते.
पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. एस. गावित या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करत होते. पोलीस विविध दिशांनी शोध घेत होते. घरून रागवून निघालेला यश थेट मुंबईत पोहोचला होता. मुंबईत काही दिवस काढल्यानंतर अखेर त्याला घराची आणि पालकांची आठवण आली. त्याने आपल्या वडिलांच्या मोबाइलवर फोन केला आणि आपण मुंबईत सुखरूप असल्याची माहिती दिली. यशचा तो परिचयाचा आवाज ऐकताच पडये कुटुंबीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि त्यांच्या जिवात जीव आला. यशचा फोन येताच वडिलांनी वेळ न दवडता मुंबईतील मुलुंड येथे राहणाऱ्या आपल्या जवळच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि सर्व हकीकत सांगितली. माहिती मिळताच मुलुंड येथील नातेवाईकांनी यशने सांगितलेल्या ठिकाणी तत्काळ धाव घेतली आणि त्याला आपल्या ताब्यात घेतले.
यशने घर सोडल्यापासून मुंबई गाठेपर्यंतचा प्रवास कसा केला, याची माहिती घेतली ऐकल्यानंतर पोलीस आणि कुटुंबीय देखील थक्क झाले. ११ मे च्या रात्री आई-वडील ओरडल्याचा राग मनात धरून तो घरातून बाहेर पडला. मयूरबाग येथून बाहेर पडल्यावर त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका अनोळखी दुचाकीस्वाराला हात दाखवून लिफ्ट मागितली आणि तो संगमेश्वरपर्यंत पोहोचला. त्यानंतर संगमेश्वरहून पुढे जाण्यासाठी त्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकला हात दाखवला. त्या ट्रकने तो खेड येथील लोटे परशुरामपर्यंत पोहोचला. पुढे त्याने रेल्वे स्टेशन गाठत रेल्वे पकडली आणि मुंबई गाठली. एका १२ वर्षांच्या मुलाने रागाच्या भरात केलेला हा प्रवास अत्यंत थरारक आणि थक्क करणारा होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून संगमेश्वर पोलीस यंत्रणा या बालकाचा शोध घेत होती. तो मुंबईत असल्याचे समजल्यानंतर मुंबईतून त्याला सुखरूप संगमेश्वर येथे आणण्यात आले. त्यानंतर नियमानुसार त्याला बालकल्याण समिती (चिल्ड्रन वेल्फेअर कमिटी) तसेच बालसुधारगृहाच्या ताब्यात देण्यात आले. तेथे आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संगमेश्वर पोलिसांच्या उपस्थितीत या बालकाला अधिकृतपणे त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी