
सोलापूर, 22 मे (हिं.स.) : अक्कलकोट आणि चिंचोली एमआयडीसी परिसरातील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले आहेत. अतिक्रमण करणाऱ्यांसोबतच त्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला इंडस्ट्रियल असोसिएशन, अक्कलकोट रोड व चिंचोली एमआयडीसीचे पदाधिकारी, विविध शासकीय अधिकारी तसेच महापालिकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांच्या समस्यांवर चर्चा झाली. अक्कलकोट एमआयडीसीतील पाणीपुरवठा, खराब रस्ते, ड्रेनेज व्यवस्था आणि वीजपुरवठा यासह विविध अडचणी मांडण्यात आल्या. तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्स्टाईल शाखा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.
पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्तांसोबत स्वतंत्र बैठक घेण्याची विनंतीही औद्योगिक संघटनांनी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
एमआयडीसीतील रस्त्यांच्या विकासासाठी शासनाकडून 75 टक्के, महापालिकेकडून 12.5 टक्के आणि उर्वरित 12.5 टक्के निधी जिल्हा नियोजन व विकास समितीद्वारे देण्यास मान्यता मिळाल्याची माहिती देण्यात आली. या कामांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, एमआयडीसी अधिकारी तसेच विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड