
रत्नागिरी, 22 मे (हिं.स.) | रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या २ लक्ष ग्रंथ संकलनासाठी सुधीर दामले यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने २५ हजारांचा निधी प्रदान केला.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने नुकताच २ लाख ग्रंथसंग्रहाचा संकल्प करून रत्नागिरीकरांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वाचनालयाला ग्रंथनिधी अगर ग्रंथ भेट द्यावेत, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत श्री. दामले यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. पटवर्धन यांच्याकडे २५ हजारांचा धनादेश २ लक्ष ग्रंथ संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपले योगदान म्हणून प्रदान केला.
आपल्या वाढदिवसाच्या दिवशी इतक्या पुरातन वाचनालयाला ग्रंथ खरेदीसाठी निधी देताना मनापासून धन्यता वाटते. ग्रंथ सेवा ही ईश्वर सेवा आहे. आपल्या रत्नागिरीतील वैभवशाली अशा ग्रंथालयात वाढदिवसानिमित्त योगदान करता आले याचा मनस्वी आनंद होतो, असे श्री. दामले म्हणाले. याप्रसंगी श्री. दामले यांचा पुष्प आणि शुभेच्छा पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी