महायुतीकडून युवा स्वाभिमान पार्टीला उमेदवारी द्या; सुनिल राणा यांच्यासह चौघांची मागणी
अमरावती, 22 मे (हिं.स.)। अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीच्या कोअर कमेटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीकडून अमरावती विधान परिषद मतदारसंघ युवा स्वाभिमान पार्टीला सोडण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्
महायुतीकडून युवा स्वाभिमान पार्टीला उमेदवारी द्या; विधान परिषदेसाठी सुनिल राणा यांच्यासह चौघांची मागणी


अमरावती, 22 मे (हिं.स.)।

अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीच्या कोअर कमेटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीकडून अमरावती विधान परिषद मतदारसंघ युवा स्वाभिमान पार्टीला सोडण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव कात्रे यांच्याकडे याबाबत निवेदनही सादर करण्यात आले.

यावेळी सुनिल राणा, उपमहापौर सचिन भेंडे, डॉ. अविनाश चौधरी आणि संजय भारसाकळे यांनी विधान परिषदेसाठी पक्षाकडून उमेदवारी मिळावी, अशी अधिकृत मागणी केली. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी युवा स्वाभिमान पार्टीने गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागातील जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने संघर्ष केला असल्याचे सांगितले. पक्षाची जिल्ह्यात मजबूत संघटनात्मक ताकद निर्माण झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही प्रभावी संख्याबळ असल्याचा दावा करण्यात आला.

पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, युवा स्वाभिमान पार्टी ही महायुतीची विश्वासू सहयोगी असून आगामी निवडणुकीत पक्षाला उमेदवारी दिल्यास कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण होईल. त्याचा थेट फायदा महायुतीला होऊ शकतो. तसेच मतदारांमध्ये पक्षाबद्दल सकारात्मक वातावरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बैठकीत पक्षाने नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर भूमिका घेत विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विधान परिषदेत पक्षाला प्रतिनिधित्व मिळणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.बैठकीच्या शेवटी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी युवा स्वाभिमान पार्टीच्या मागणीचा सकारात्मक विचार करून अमरावती विधान परिषद मतदारसंघ पक्षाला द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande