
मुंबई, 22 मे (हिं.स.) - मध्य रेल्वेच्या हार्बर लाईनवरील वातानुकूलित उपनगरीय सेवांना प्रवाशांच्या प्रतिसादात लक्षणीय वाढ दिसून आली आहे, जे प्रवाशांची आरामदायक, जलद आणि प्रीमियम उपनगरीय प्रवासासाठी वाढती पसंती दर्शवते.
हार्बर मार्गावर वातानुकूलित उपनगरी सेवा दिनांक २६.०१.२०२६ रोजी सुरू करण्यात आल्या आणि त्यांच्या सुरुवातीपासूनच प्रवाशांकडून त्यांना उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे.
प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार, मध्य रेल्वेने दिनांक ०१.०५.२०२६ पासून हार्बर मार्गावर १४ अतिरिक्त वातानुकूलित सेवा सुरू केल्या आहेत. या वाढीमुळे, मध्य रेल्वेच्या वातानुकूलित उपनगरीय सेवांमध्ये आता एकूण १०८ सेवांचा समावेश झाला आहे, ज्यात मेन लाईनवरील ८० आणि हार्बर लाईनवरील २८ सेवांचा समावेश आहे.
दिनांक ०१.०५.२०२६ पासून हार्बर लाईनवरील वातानुकूलित सेवांमध्ये वाढ झाल्यामुळे, प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. * दिनांक १६.०४.२०२६ ते दिनांक ३०.०४.२०२६* आणि दिनांक ०१.०५.२०२६ ते दिनांक १५.०५.२०२६ या १५ दिवसांच्या कालावधींची तुलना केल्यास लक्षणीय सुधारणा दिसून येते.
* हार्बर मार्गावर वातानुकूलित सेवेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २.३४ लाखांवरून ३.८६ लाखांपर्यंत झपाट्याने वाढली असून, ६४.९७% वाढ नोंदवली गेली आहे.
* हार्बर मार्गावर वातानुकूलित उपनगरीय सेवांमधून मिळणाऱ्या महसुलातही प्रभावी वाढ दिसून आली असून, तो १.१८ कोटी रुपयांवरून ₹१.९६ कोटी रुपयापर्यंत वाढला आहे, जी ६६.४३% वाढ आहे.
तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली
मध्य रेल्वेचा मुंबई विभाग अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी आणि खऱ्या प्रवाशांची सुरक्षितता व सोय सुनिश्चित करण्यासाठी वातानुकूलित लोकलमध्ये आणि स्थानकांवर वारंवार विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवतो. या विशेष तपासण्यांमुळे योग्य तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शोधून दंड आकारण्यास मदत होते आणि तिकिटाशिवाय प्रवास करण्याविरोधात एक प्रभावी प्रतिबंधक म्हणून काम करते.
उपनगरी प्रवाशांना अधिक आरामदायी आणि उत्कृष्ट प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मध्य रेल्वेने केलेल्या प्रयत्नांना प्रवाशांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून, मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कमधील प्रीमियम प्रवास सुविधांनाही त्यामुळे अधिक बळ मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी