मराठा आरक्षणावरून जरांगेंचे सरकारला अनेक प्रश्न
छत्रपती संभाजीनगर, 22 मे (हिं.स.) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारवर तीव्र टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी प्रसाद लाड यांच्या भूमिकेचे कौतुक करत त्यांना चर्चेसाठी बोलावल्याचे सांगितले, तसेच ते मुख्यमंत्
मराठा आरक्षणावरून जरांगेंचे सरकारला अनेक प्रश्न


छत्रपती संभाजीनगर, 22 मे (हिं.स.) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारवर तीव्र टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी प्रसाद लाड यांच्या भूमिकेचे कौतुक करत त्यांना चर्चेसाठी बोलावल्याचे सांगितले, तसेच ते मुख्यमंत्री शिष्टमंडळाचा भाग असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जरांगे म्हणाले की, “सरकारने मागण्या मान्य केल्या तर आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही. आम्ही ओबीसी आरक्षण मागत नाही, तर आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत.”

ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. 2004 च्या शासन निर्णयानुसार मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ओबीसी आरक्षण आणि जातींच्या समावेशाबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. “चार वर्षांत ओबीसींची संख्या 30 टक्के कशी वाढली?” असा सवाल करत त्यांनी आरक्षण निकषांबाबत स्पष्टता मागितली.

शिक्षण व शिष्यवृत्ती संदर्भातही त्यांनी सरकारवर टीका केली. “मराठा विद्यार्थ्यांची संख्या कमी का केली? 80 हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती का थांबवली?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

मनोज जरांगे असेही म्हणाले की, मराठा समाजाला मागास सिद्ध करूनही आरक्षण मिळत नाही, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण कशाच्या आधारावर वाढवले जाते, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी.

या विधानांमुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande