
पुणे, 22 मे (हिं.स.)। शहरात विविध मेट्रो मार्गांचे काम सध्या वेगाने सुरू असून भविष्यात नागरिकांना वाहतुकीचा मोठा फायदा होणार आहे. मात्र, सध्या मेट्रो बांधकामामुळे काही भागांमध्ये वाहतूक आणि सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत बदल करण्यात येत आहेत. पीएमपीच्या कात्रज पोलिस चौक बसथांब्यावर मेट्रो स्थानकाचे काम सुरू करण्यात आल्याने येथील बसथांबा तात्पुरता स्थलांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे कात्रज परिसरातून पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना काही काळ नव्या ठिकाणांवरून बस पकडावी लागणार आहे.सध्या मेट्रो च्या पर्पल लाईनअंतर्गत स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे.
कात्रज पोलिस चौक हे या मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून बांधकाम सुरळीत पार पडावे यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.पीएमपी प्रशासनाने याबाबत अधिकृत माहिती जाहीर करत सांगितले की, मेट्रोच्या कामात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून कात्रज पोलिस चौकावर थांबणाऱ्या बसचे थांबे जवळच्या पर्यायी ठिकाणी हलवण्यात आले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत ही सुधारित व्यवस्था कायम राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.या बदलामुळे काही काळ प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता असली तरी भविष्यात मेट्रोमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि जलद होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु