राष्ट्रवादीतील वाद पेल्यातील वादळ; लवकरच शांत होईल : मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर, 22 मे (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद लवकरच मिटतील आणि हे सर्व “पेल्यातील वादळ” असून आठवडाभरात परिस्थिती शांत होईल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. कागल येथे आयोजित पत्रकार
मंत्री हसन मुश्रीफ


कोल्हापूर, 22 मे (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद लवकरच मिटतील आणि हे सर्व “पेल्यातील वादळ” असून आठवडाभरात परिस्थिती शांत होईल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.

कागल येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुश्रीफ यांनी राज्यातील तसेच जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. महायुतीमधील समन्वयावर बोलताना त्यांनी सांगितले की, तिन्ही पक्षांमध्ये दर मंगळवारी समन्वय समितीची बैठक होते आणि त्या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाते.

शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी “राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे” असे केलेल्या वक्तव्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. “आमच्या पक्षातील बाबींवर बाहेरील नेत्यांनी वारंवार भाष्य करणे योग्य नाही,” असे ते म्हणाले. तसेच हा मुद्दा समन्वय समितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षातील आमदार शरद पवार यांना भेटल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम देत, “कोणीही आमदार त्यांना भेटलेले नाहीत. भेटले असतील तर ते केवळ सौजन्य भेटी असतील,” असे त्यांनी सांगितले. पक्षातील सर्व नेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाचे शरद पवार यांनी केलेले कौतुक त्यांनी स्वागतार्ह असल्याचे सांगितले. तसेच राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना, विरोधी पक्षनेत्यांनी संयम बाळगणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

विधान परिषद निवडणुकांबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पुणे, रायगड-रत्नागिरी आणि परभणी-हिंगोली या जागांवर दावा करणार असून सर्व जागा जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्ष संघटन मजबूत असून अजित पवार यांचा प्रभाव पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षण आंदोलन, गोकुळ दूध संघ निवडणूक, तसेच कर्जमाफी यांसारख्या मुद्द्यांवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. 30 जून 2025 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय होईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.

दरम्यान, आमदार शिवाजी पाटील यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला.

महायुती एकत्रितपणे आगामी निवडणुका लढवेल आणि विजय मिळवेल, असा विश्वासही मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande