
कोल्हापूर, २२ मे (हिं.स.) : आगामी ३१ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मौखिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP) अंतर्गत सीपीआर रुग्णालय आणि सेवा रुग्णालय, कसबा बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले.
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन
या शिबिराचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक (प्रभारी) डॉ. सरिता थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाचे नेतृत्व जिल्हा सल्लागार (NTCP) डॉ. व्ही. ए. आरळेकर यांनी केले. यावेळी दंत शल्य चिकित्सक डॉ. अर्चना पाटील उपस्थित होत्या.
तंबाखू सेवनाचे दुष्परिणामांवर जनजागृती
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. व्ही. ए. आरळेकर यांनी तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर आरोग्य परिणाम, कर्करोगासारखे आजार तसेच कोटपा कायदा (COTPA Act 2003) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य व पोलीस विभागांनी संयुक्तपणे काम करण्याची गरज व्यक्त केली.
मौखिक आरोग्यावर भर
दंत चिकित्सक डॉ. अर्चना पाटील यांनी मौखिक आरोग्याची काळजी घेणे, नियमित दंत तपासणी करणे आणि तोंडाच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
या शिबिराचा लाभ उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला.
-----------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar