
नंदुरबार, , 22 मे (हिं.स.) मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना 2026-27 अंतर्गत 03-नंदुरबार व 04- नवापूर विधानसभा क्षेत्रातील विविध कामांसाठी कंत्राटदारांचे नामनिर्देशन (Empanelment) करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र कंत्राटदारांनी 29 मे 2026 पर्यंत आवेदन पत्रे सादर करावीत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी नंदुरबार भाग, नंदुरबार उषाराणी देवगूणे-दहिकर यांनी केले आहे. या योजनेसाठी आवश्यक यंत्रसामुग्री, इंधन व मनुष्यबळासाठी प्रति तासिका दर ई-निविदेद्वारे मागविण्यात आले होते. प्राप्त निविदांमधील न्यूनतम दराला (L1 Rate) जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली असून, तोच दर या प्रक्रियेसाठी आधारभूत मानण्यात आला आहे. अर्ज करताना कंत्राटदारांनी ज्या विधानसभा क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे, त्या क्षेत्राचा प्राधान्यक्रम अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. तसेच अर्जासोबत 10 हजार रुपयांचा धनाकर्ष (Demand Draft) जोडणे बंधनकारक आहे. याशिवाय कार्यकारी अभियंता, पंतप्रधान ग्रामसडक योजना, नंदुरबार यांच्या नावे 15 लाख रुपयांची मुदत ठेव पावती (FDR) जमा करावी लागणार आहे. पात्र कंत्राटदारांनी सर्व आवश्यक तांत्रिक व कायदेशीर कागदपत्रांसह अर्ज निश्चित मुदतीत सादर करावेत. अधिक माहितीसाठी उपविभागीय अधिकारी नंदुरबार भाग, नंदुरबार कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही
आवाहन श्रीमती देवगूणे-दहिकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर