
जळगाव , 22 मे (हिं.स.) वाढत्या उन्हाळ्यामध्ये पाण्याचा वापर वाढला असतानाच, जळगाव शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या वेळापत्रकाचा पुरता बुरखा फाटला आहे. शनिपेठ परिसरात तर परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, तीन दिवसांपूर्वी आलेले पाणी चौथ्या दिवशीही वेळेवर न आल्यामुळे नागरिकांची प्रचंड कोंडी झाली आहे. ऐन उन्हाळ्यात मनपा प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे संतप्त नागरिकांमधून पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा असा संतप्त सूर उमटत आहे. उन्हाळ्यात लहान मुले, वृद्ध आणि घरगुती कामांसाठी पाण्याचा वापर वाढतो. अशा संवेदनशील काळात महानगरपालिकेने पाण्याचे नियोजन चोख ठेवणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा थेट एक दिवस पुढे ढकलला. मनपाच्या या मनमानी कारभारामुळे नोकरदार, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी धांदल उडाली. पाणी कधी येईल याचा नेम नसल्याने नागरिकांना रात्री-अपरात्री जागून काढावी लागत आहे. आम्ही मनपाचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वेळेवर भरतो, मग आम्हाला मूलभूत सुविधांसाठी का भीक मागावी लागत आहे? असा संतप्त सवाल शनिपेठ परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने शहरात दररोज आणि पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करण्याचे दिलेले आश्वासन पूर्णपणे फोल ठरले आहे. विना मोटरने दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी चढणार असा दावा करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचे सगळे दावे फेल झाले असून, आता नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एकीकडे मुलभूत सुविधा पुरवण्यात महापालिका अपयशी ठरली असताना, दुसरीकडे मात्र नागरिकांच्या घरावर पाण्याचे मीटर बसवण्याची तयारी सुरू झाल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. वेळेवर कर वसूल करताना तत्परता दाखवणारे मनपा प्रशासन पाणी देण्याच्या वेळेस मात्र सुस्त का असते, असा रोकडा सवाल आता नागरिक विचारत आहेत. कर भरूनही जर पाणी आणि इतर सुविधा मिळत नसतील, तर नागरिकांनी करायचे काय? असा उद्विग्न प्रश्न आता निर्माण झाला आहे.प्रशासकीय अनास्थेचा कळसशहरातील पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून, अधिकाऱ्यांचे यावर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. पाणी टंचाईमुळे नागरिकांना खाजगी टँकर्सचा आधार घ्यावा लागत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर