नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता अंबाजोगाईत; सीबीआयकडून २ विद्यार्थ्यांची ३ तास कसून चौकशी
बीड, 22 मे (हिं.स.)। देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात पोहोचले आहेत. या हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अंबाजोगाईत धडक कारवाई करत दोन संश
नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता अंबाजोगाईत; सीबीआयकडून २ विद्यार्थ्यांची ३ तास कसून चौकशी


बीड, 22 मे (हिं.स.)।

देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात पोहोचले आहेत. या हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अंबाजोगाईत धडक कारवाई करत दोन संशयित विद्यार्थ्यांची तब्बल तीन तास कसून चौकशी केली. हे दोन्ही विद्यार्थी लातूर येथे राहून वैद्यकीय परीक्षेची तयारी करत होते. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच या विद्यार्थ्यांनी गैरमार्गाने किंवा आर्थिक देवाणघेवाण करून पेपर मिळवला असल्याचा दाट संशय तपास यंत्रणेला आहे. सीबीआयच्या या गुप्त कारवाईमुळे मराठवाड्यातील शैक्षणिक वर्तुळात आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

स्थानिक पोलिसांना कोणतीही भनक लागू न देता सीबीआयच्या विशेष तपास पथकाने आज सकाळीच अंबाजोगाईत थेट संशयित विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. एका अज्ञात ठिकाणी झालेल्या या मॅरेथॉन चौकशीदरम्यान तपास यंत्रणेने दोन्ही विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन आणि मेमरी कार्ड जप्त केले आहेत. लातूर हे कोचिंग क्लासेसचे मुख्य केंद्र असल्याने या प्रकरणाचे धागेदोरे लातूरमधील मोठ्या रॅकेटशी जोडले गेल्याचे उघड होत आहे. जप्त केलेल्या मोबाईलमधील डिजिटल डेटा, व्हॉट्सॲप चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्सच्या फॉरेन्सिक तपासणीतून आता कोणता मोठा खुलासा समोर येतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विस्कळीत झालेल्या परीक्षा पद्धतीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, या रॅकेटची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत हे शोधण्याचे मोठे आव्हान आता सीबीआयसमोर आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande