पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही; अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हाधिकारी सेठी
नंदुरबार , 22 मे (हिं.स.) जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी अफवा आणि भीतीपोटी इंधनाचा अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील 51 पेट्रोल पंपांवर मो
पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही; अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हाधिकारी सेठी


नंदुरबार , 22 मे (हिं.स.) जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी अफवा आणि भीतीपोटी इंधनाचा अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील 51 पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून नागरिक वाहने, ड्रम व बॅरल घेऊन पेट्रोल भरण्यासाठी येत आहेत. मात्र, हा तुटवडा पूर्णपणे कृत्रिम असून जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. उलट पुरवठ्यात वाढ करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी स्पष्ट केले आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार असल्याच्या अफवा पसरत असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी करून साठवणूक करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. आजपासून जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर बाटली, ड्रम किंवा बॅरलमध्ये सुटे (लूज) पेट्रोल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवांसाठी प्रत्येक पेट्रोल पंपाने किमान 10 टक्के इंधन साठा राखून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्व पेट्रोल पंपांवर कडक पाळत ठेवण्यात येणार असून सीसीटीव्ही यंत्रणा सुरू ठेवणे, तसेच कोणाला किती इंधन देण्यात आले याची नोंद ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. नागरिकांनी भीतीचे वातावरण निर्माण न करता केवळ दैनंदिन गरजेनुसारच पेट्रोल-डिझेल खरेदी करावे. विनाकारण साठेबाजी आणि गर्दी सुरू राहिल्यास प्रशासनाला आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande