
१२८ दिवस सुट्ट्या, २३७ दिवस शालेय कामकाजउन्हाळी सुट्टी २ मे ते १४ जून; १५ जूनपासून सकाळ सत्रात शाळा
अमरावती, 22 मे (हिं.स.)
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्राथमिक शाळांच्या सुट्ट्यांचे नियोजन जाहीर केले आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सतीश मुगल यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळांना हे नियोजन लागू राहणार आहे.
नियोजनानुसार सार्वजनिक, स्थानिक, दिवाळी, उन्हाळी तसेच विविध विशेष सुट्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. शासनाच्या अधिसूचनेनुसार २४ सार्वजनिक सुट्ट्यांपैकी महाशिवरात्री व लक्ष्मीपूजन या रविवारी आल्याने एकूण २२ दिवस सार्वजनिक सुट्ट्या राहणार आहेत. अमरावती विभागीय आयुक्तांच्या अधिकारातील रक्षाबंधन, पोळा आणि गौरी पूजन अशा तीन विशेष सुट्ट्यांनाही मंजुरी देण्यात आली आहे. - तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी यात्रा
महोत्सव, संत गाडगेबाबा पुण्यतिथी, जिल्हा परिषद व तालुका क्रीडा महोत्सव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अधिकारातील सुट्टी अशा स्थानिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. दिवाळी सुट्टी ६ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान राहणार असून उन्हाळी सुट्टी २ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जाहीर करण्यात आली आहे. विदर्भातील वाढते तापमान लक्षात घेऊन शासनाच्या निर्देशानुसार ही सुट्टी निश्चित करण्यात आली असल्याचे आदेशात नमूद आहे. १५ जून ते २९ जून या कालावधीत सर्व माध्यमांच्या शाळा सकाळ सत्रात सकाळी ७ ते ११.४५ या वेळेत भरतील. त्यानंतर ३० जूनपासून नियमित वेळेत शालेय सत्र सुरू राहणार आहे. एकूण ३६५ दिवसांपैकी १२८ दिवस सुट्ट्या राहणार असून २३७ दिवस शालेय कामकाज होणार आहे. शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार आवश्यक शैक्षणिक तास पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे नियोजन करण्यात आले असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी