अमरावतीत शिवसेना उबाठाचा वीज कंपनी विरोधात 'एल्गार', २५ मे रोजी विद्युत भवन समोर आंदोलन
- विज मंत्री देवाची'' महाआरती करून निषेध अमरावती, 22 मे (हिं.स.) मागील ३ महिन्यांपासून वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून विजेच्या लपंडावाला वैतागून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ''विज मंत्री देवा''ची महाआरती करून
अमरावतीत शिवसेना उबाठाचा वीज कंपनी विरोधात 'एल्गार', २५ मे रोजी विद्युत भवन समोर आंदोलन


- विज मंत्री देवाची' महाआरती करून निषेध

अमरावती, 22 मे (हिं.स.)

मागील ३ महिन्यांपासून वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून विजेच्या लपंडावाला वैतागून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 'विज मंत्री देवा'ची महाआरती करून विज कंपनीचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, २५ मे रोजी सकाळी १० वाजता विद्युत भवन समोर हे प्रतिकात्मक आंदोलन होणार आहे.

दिवसेंदिवस तासनतास वीज खंडित होण्याचे प्रकार वाढल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. वादळ-वारा नसतानाही वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे ही बाब कमी न होता सातत्याने वाढत आहे. अधिकारी मात्र विविध कारणे देऊन मोकळे होतात, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.वीज तक्रार केंद्रात अपुरे कर्मचारी असून तक्रारी साठी फोन केल्यास वारंवार फोन न लागणे, न उचलणे, सतत व्यस्त असणे या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री १० नंतर लाईन गेल्यास तक्रार केंद्रच बंद असतात, अशी स्थिती आहे. विजेच्या लपंडावामुळे पाणी पुरवठा विभागाचे वेळापत्रक कोलमडले आहे. पूर्वसूचना न देता वीज जाण्याने उद्योग व व्यवसायाचे आर्थिक नुकसान होत आहे.अविरत सुरळीत सेवेसाठी अनेकदा निवेदन व तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने विज कंपनीच्या कारभारावर दिवसेंदिवस संतापाचा उद्रेक वाढत आहे.सुरळीत, अखंडित वीज पुरवठा व विद्युत तक्रार केंद्रातील तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी, या रास्त मागण्हीसाठी शासनाचे व प्रशासनाचे लक्ष गांभीर्याने वेधण्यासाठी 'विज मंत्री देवा'ची महाआरती करून निषेध करण्यात येणार आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा कार्यालयप्रमुख नितीन तारेकर यांनी या प्रतिकात्मक आरतीला विज कंपनीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी, शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande