
पुणे, 22 मे (हिं.स.) : शहरावर संभाव्य पाणीटंचाईचे संकट गंभीर होत असून खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा झपाट्याने घटला आहे. सध्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चार धरणांमध्ये मिळून केवळ साडेसात टीएमसी म्हणजेच सुमारे 25 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.विशेष म्हणजे पानशेत धरणातील पाणीसाठा पूर्णपणे शून्यावर पोहोचला आहे, तर टेमघर धरण पूर्णतः रिकामे झाले आहे. त्यामुळे पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने खडकवासला कालव्यातून दौंड, इंदापूर आणि बारामती भागातील शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर 30 मेनंतर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम शेती क्षेत्रावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान विभागाने यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वर्तविल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. वेळेत योग्य नियोजन न झाल्यास पुणे शहरासह परिसरात गंभीर पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
पुणे महापालिका आणि पाटबंधारे विभागाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तज्ज्ञांच्या मते, पिण्याचे पाणी, सिंचन आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन जलनियोजन करणे अत्यावश्यक बनले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु