
पुणे, 22 मे (हिं.स.)।
पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रकारामुळे चर्चेत आले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाजवळील ‘अनिकेत कॅन्टीन’मध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या पोह्यांमध्ये अळी आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच विद्यापीठाच्या भोजनगृहातील भाजीमध्येही अळी आढळल्याची घटना समोर आली होती. सलग घडणाऱ्या या प्रकारांमुळे विद्यापीठ प्रशासनाच्या निष्क्रियतेवर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ‘अनिकेत कॅन्टीन’मध्ये नाश्त्यासाठी घेतलेल्या पोह्यांच्या प्लेटमध्ये अळी आढळली. विद्यार्थ्यांनी तत्काळ ही बाब कॅन्टीन व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, तक्रार करूनही तेच पोहे विद्यार्थ्यांना दिले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.विद्यापीठात भोजनगृह आणि उपहारगृह दक्षता नियंत्रण समिती अस्तित्वात असतानाही प्रत्यक्षात कोणतेही प्रभावी नियंत्रण नसल्याचे या घटनांमधून स्पष्ट होत आहे. विद्यार्थ्यांनी यापूर्वीही निकृष्ट दर्जाचे अन्न, अस्वच्छता, वाढीव दर आणि मनमानी कारभाराबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या.मात्र प्रशासनाकडून केवळ नोटिसा आणि बैठकींपलीकडे ठोस कारवाई होत नसल्याने कॅन्टीन चालक अधिकच बेफाम होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. या प्रकारानंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु