
अमरावती, 22 मे (हिं.स.)।
येथील पंचतारांकित एमआयडीसीतील रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाविरोधात पुन्हा एकदा गंभीर आरोप समोर आले असून, राख वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भार भरून दिला जात असल्याचा आरोप प्लॉय अॅश ट्रान्सपोर्ट युनियनने केला आहे. याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालय, अमरावती येथे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम १९९ अंतर्गत प्रकल्प व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या तक्रारीनुसार, कंपनीकडून राख वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त भार भरला जात आहे. यामुळे वाहनचालकांवर कारवाईचा धोका निर्माण होत असून, रस्ते अपघातांची शक्यता देखील वाढत आहे. विशेष म्हणजे, याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने यापूर्वीच दिनांक ०८ ऑक्टोबर २०२४ रोजी पत्र क्रमांक ३४०९ द्वारे कंपनीला नोटीस बजावून क्षमतेपेक्षा जास्त भार न भरण्याचे निर्देश दिले होते. तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम १९९ प्रमाणे कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे कंपनीकडून आजही ओव्हरलोड राख वाहतूक सुरूच असल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे.
कंपनी परिसरात वजन काटा उपलब्ध असतानाही नियमानुसार वजन करून वाहने सोडली जात नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारामुळे वाहनधारक, चालक आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे बलवीर चव्हाण, राजू चिरडे, अभिषेक गावंडे, सतीश तायडे, उमेश डोईफोडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच, नियमबाह्य ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची होणारी हानी आणि अपघातांचा धोका लक्षात घेता प्रादेशिक परिवहन विभागाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ओव्हरलोड राख वाहतुकीमागे 'मलिदा'
रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पातून राख वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त राख भरली जात असल्याचे गंभीर आरोप आहेत. अतिरिक्त पैशांच्या मोहापोटी आरटीओ नियमांची पायमल्ली होत असल्याची चर्चा असून, या ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. वाहनचालकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या प्रकारावर तातडीने आळा घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी