
सोलापूर, 22 मे (हिं.स.)।
दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील निंबळक ते अकोळनेर दरम्यान सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाचा मोठा परिणाम सोलापूर विभागातील रेल्वे वाहतुकीवर होत आहे. युद्धपातळीवर सुरू असलेल्या या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या तासन्तास उशिराने धावत असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस, हरंगुळ-हडपसर एक्स्प्रेससह विविध गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. परिणामी प्रवाशांना ऐनवेळी महागड्या खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून रेल्वे स्थानकांवरही मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सोलापूर विभागातील अनेक गाड्या ‘लिंक रेक’ पद्धतीने चालवल्या जात असल्याने एका गाडीच्या विलंबाचा परिणाम इतर गाड्यांवरही होत आहे. दौंड-मनमाड मार्गावरील कामामुळे मूळ गाड्यांनाच उशीर होत असल्याने पुढील फेऱ्यांमध्येही विलंब वाढत असून संपूर्ण वेळापत्रक कोलमडले आहे.
सोलापूरकरांची जीवनवाहिनी मानली जाणारी पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस सलग तीन दिवस दोन्ही बाजूंनी तब्बल तीन तास उशिराने धावली. त्यामुळे रोज प्रवास करणारे नोकरदार आणि प्रवासी वर्गाचे मोठे नुकसान झाले.
तसेच हरंगुळ-हडपसर एक्स्प्रेस नेहमी सायंकाळी ५.२० वाजता कुर्डुवाडी स्थानकात पोहोचते. मात्र ही गाडी तब्बल सहा तास उशिराने धावत असल्याने ती रात्री उशिरा कुर्डुवाडीत पोहोचणार होती. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ प्रवाशांचे मोठे हाल झाले.
याशिवाय पनवेल-नांदेड एक्स्प्रेस आणि दिल्ली-बंगळूरू कर्नाटक एक्स्प्रेस या गाड्याही प्रत्येकी सुमारे दोन तास उशिराने धावल्या. रेल्वे प्रशासनाने काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांनी वेळापत्रकाची माहिती घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड