
रायगड, 22 मे (हिं.स.)। नागाव समुद्र बीच येथे पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तींना वाचविण्यासाठी उपयोगी ठरत असलेल्या “रोबोटिक बोयो” या आधुनिक जीवरक्षक यंत्राचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या प्रात्यक्षिकाला कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी उपस्थित राहून यंत्राची कार्यपद्धती प्रत्यक्ष पाहिली व “रोबोटिक बोयो खऱ्या अर्थाने जीवनरक्षक ठरत आहे,” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
या वेळी त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. तसेच या उपकरणामुळे पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना जलद गतीने मदत पोहोचविणे शक्य होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ, जिल्हाधिकारी किशन जावळे , मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भेटीदरम्यान विभागीय आयुक्तांनी नागाव बीचवरील मूलभूत सुविधांची पाहणी केली. पर्यटकांच्या सोयीसाठी बीच परिसरात अधिक शौचालये उभारावीत तसेच इतर आवश्यक सुविधा वाढवाव्यात, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. याशिवाय समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांची माहिती संकलित करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, “रोबोटिक बोयो” या आधुनिक उपकरणामुळे किनारपट्टी भागातील बचावकार्य अधिक वेगवान आणि प्रभावी होण्यास मदत होणार असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)