
सोलापूर, 22 मे (हिं.स.) : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचे अश्लील फोटो काढल्याच्या आरोपातून आरोपी धनाजी बिरू कोळेकर याची सोलापूर येथील विशेष न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल विशेष न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी दिला.
प्रकरणानुसार, आरोपी धनाजी कोळेकर हा ‘बँक मित्र’ म्हणून पासबुक काढून देण्याचे काम करत होता. 1 फेब्रुवारी 2018 रोजी पाचवीत शिकणारी 11 वर्षीय मुलगी पासबुक काढण्यासाठी त्याच्या घरी गेली असताना, तिचा विनयभंग करून मोबाईलमध्ये अश्लील फोटो काढल्याचा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा, अॅट्रॉसिटी कायदा तसेच भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त एम. बी. सकळे यांनी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपीतर्फे ऍड. आल्हाद अंदोरे यांनी पुरावे अपुरे असल्याचा युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपीतर्फे ऍड. आल्हाद अंदोरे, ऍड. अथर्व अंदोरे आणि ऍड. सुयश पुळूजकर यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे ऍड. एस. एस. क्यातम यांनी बाजू मांडली.
-------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड