
कोल्हापूर, 22 मे (हिं.स.)। वाढती महागाई, इंधन दरवाढ व केंद्र-राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज इचलकरंजी येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. महात्मा गांधी पुतळा परिसरात तिरडीवर गॅस सिलेंडर व गाडी ठेवून तर महिलांनी चौकातच चूल पेटवून केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी पार गेले, गॅस-सिलिंडर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला. पण सरकार फक्त आश्वासनांची खैरात वाटतंय. शेतकरी, कामगार, युवक आज देशोधडीला लागलाय, असा घणाघात यावेळी जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी केला.
माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, शहरप्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील यांच्यासह सर्वांनीच आपल्या मनोगतात केंद्र व राज्यसरकारचा समाचार घेतला. यावेळी महात्मा गांधी पुतळा परिसर सरकारच्या विरोधातील घोषणांनी दणाणून गेला.
यावेळी तालुकाप्रमुख आनंदा शेट्टी, माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, शहरप्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील,माजी शहरप्रमुख धनाजी मोरे, महिला आघाडीच्या उप जिल्हासंघटिका मंगलताई मुसळे, तालुका संघटिका शोभा गोरे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar