कल्याण-डोंबिवली विकास आणि रोजगार केंद्र बनणार - डॉ. श्रीकांत शिंदे
मुंबई, 22 मे (हिं.स.)। मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी महायुती सरकार एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्स, ग्रोथ सेंटर्स, लॉजेस्टिक सेंटर्स उभारत आहे. ‘एमएमआर’च्या उत्तरेला वाढवण बंदर विकसित होत आहे. या प्रकल्पात तब्बल ७५ हजार कोटींची गुंतवणूक होणार असून लाख
shrikant shinde


मुंबई, 22 मे (हिं.स.)। मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी महायुती सरकार एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्स, ग्रोथ सेंटर्स, लॉजेस्टिक सेंटर्स उभारत आहे. ‘एमएमआर’च्या उत्तरेला वाढवण बंदर विकसित होत आहे. या प्रकल्पात तब्बल ७५ हजार कोटींची गुंतवणूक होणार असून लाखो नोकऱ्या निर्माण होतील. उजवीकडे नवी मुंबई, अलिबाग हा पट्टा विकसित होत आहे. तिसऱ्या बाजूला ‘एमएमआर’मधला सर्वात वेगाने विकसित होणारा भाग म्हणजे कल्याण लोकसभा मतदार संघ आहे. कल्याण रोड, ऐरोली काटई फ्री वे, वॉटर ट्रान्सपोर्ट, मेट्रो विस्तार अशा बड्या प्रकल्पांमुळे कल्याण-डोंबिवली नजिकच्या काळातील विकास आणि रोजगारांचे केंद्र बनेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे कल्याणचे तीनवेळचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. मुंबई आयोजित पायाभूत सेवा क्षेत्रासंबधी चर्चासत्रात ते बोलत होते.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, पायाभूत सेवा क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने मुंबई महानगर क्षेत्राचं येत्या काही वर्षात भरीव योगदान राहील. विकसित भारत २०४७ पर्यंत मुंबई एमएमआर क्षेत्राची अर्थव्यवस्था १.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल. ते पुढे म्हणाले की, ६८०० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले मुंबई महानगर क्षेत्र आजच्या घडीला वेगाने विकसित होत आहे. या ठिकाणी पायाभूत सेवा, अत्याधुनिक दळणवळण यंत्रणा आणि गृहनिर्माणावर सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे, असे ते म्हणाले. एमएमआरमध्ये ४ लाख कोटींचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात ३७७ किमी लांबीचे जगातील सर्वात मोठे नेटवर्क उभारले जात आहे. मुंबईवरील भार कमी करताना ठाणे, कल्याण, तळोजा लगतच्या उपनगरांमध्ये मेट्रो विस्तार, डेटा सेंटर्स, कौशल्य विकास केंद्र विकसित केले जातील. ज्यामुळे स्थानिकांना या ठिकाणी रोजगार मिळतील आणि मुंबई किंवा बड्या शहरांमध्ये त्यांना प्रवास करावा लागणार नाही.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगर या महापालिका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी एकत्र आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात १०१ जलवाहतूक मार्ग विकसित केले जाणार आहेत. त्यापैकी कल्याणमधून वसई-विरार, नवी मुंबई आणि मुंबईला जलमार्गाने लवकरच जोडले जाईल. या ठिकाणी जेट्टींचे काम सुरु आहे. कल्याणला लाभलेल्या खाडीमधून हे सर्व मार्ग जोडले जातील, असे ते म्हणाले. त्याचबरोबर बदलापूरहून नवी मुंबई आणि मुंबई विमानतळांसाठी अँक्सेस कंट्रोल रोड तयार केला जात आहे. अँक्सेस कंट्रोलमुळे अंतर्गत वाहतूक कोंडीतून स्थानिकांची सुटका होईल आणि त्यांना या मार्गाने थेट मुंबई गाठणे शक्य होईल असे ते म्हणाले. अंबरनाथमधील ऐतिहासिक शिवमंदीराचा सोमनाथ, उज्जैन महाकालच्या धर्तीवर विकास केला जाईल. यासाठी २०० कोटी खर्च होणार असून यातून आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*चौकट*

*सर्वसमावेश विकासाची क्लस्टर योजना ठरेल गेमचेंजर*

मुंबई महानगर क्षेत्राचे झपाट्याने शहरीकरण होत असून यामुळे मोकळ्या जागा कमी होत आहेत. येथील नागरिकांना सर्व सुविधांसह घरांच स्वप्न पूर्ण करणारी क्लस्टर योजना गृहनिर्माण क्षेत्रात गेमचेंजर ठरेल, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात क्लस्टर योजना आणली. गरिबांना सुसज्ज घर आणि सोयी सुविधा देणाऱ्या क्लस्टर योजनेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. आज मुंबईत १९ ठिकाणी क्लस्टर योजना सुरु आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या ठिकाणी क्लस्टर योजना सुरु आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande