
सोलापूर, 22 मे (हिं.स.)। जुळे सोलापूर येथे प्रस्तावित नाट्यगृहाच्या उभारणीसंदर्भात सोलापूरातील विविध नाट्य कलाकार, दिग्दर्शक, साऊंड-लाईट तज्ज्ञ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सोलापुरात पुणे आणि मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक सुविधा असलेले आधुनिक नाट्यगृह उभारण्याबाबत सकारात्मक मंथन झाले.
बैठकीत कलाकारांनी ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, प्रशस्त आसन क्षमता, अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान, कलाकारांसाठी स्वतंत्र ग्रीनरूम, सरावासाठी सुसज्ज जागा तसेच पुरेशी पार्किंग व्यवस्था यांसारख्या विविध महत्त्वाच्या सुविधांची अपेक्षा व्यक्त केली. सोलापूरच्या सांस्कृतिक चळवळीला नवे बळ देणारे आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी उपयुक्त असे नाट्यगृह उभारण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.
कलाकार आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसारच नाट्यगृहाची उभारणी करण्यात येईल, अशी ग्वाही बैठकीत देण्यात आली. सोलापूरच्या सांस्कृतिक वैभवाला साजेसे, कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे तसेच नवोदित कलावंतांना प्रेरणा देणारे हे नाट्यगृह साकार करण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला महापालिकेचे श्री. प्रकाश दिवाणजी, आर्किटेक्ट चिंचोली तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. नाट्यगृहाचा आराखडा, आर्थिक व्यवहार्यता, बांधकाम खर्च आणि भविष्यातील देखभाल याबाबत अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली.
यावेळी श्री. विजय साळुंखे, श्री. जे. पी. कुलकर्णी, श्री. अमोल देशमुख, श्री. जैद शेख, डॉ. मीरा शेंडगे, सौ. शांता येळमकर, श्री. नरेंद्र गंभीरे, श्री. शिरीष देखणे आणि श्री. देवदत्त सिद्धम यांच्यासह विविध कलाकार, तज्ज्ञ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड