
सोलापूर, 22 मे (हिं.स.) : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4 कोटी 28 लाख 27 हजार 635 रुपये किमतीचा गांजा आणि अफूचा साठा नष्ट केला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा समावेश होता.
या मोहिमेत 1697 किलो 429 ग्रॅम गांजा आणि 19 किलो 618 ग्रॅम अफू नष्ट करण्यात आली. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध पोलिस ठाण्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची ही विल्हेवाट लावण्यात आली.
ही कारवाई अतुल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन अंमली पदार्थ नाश समिती मार्फत करण्यात आली. जिल्ह्यातील सोलापूर तालुका, मोहोळ, मंद्रूप, वळसंग, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, बार्शी शहर, वैराग, कुर्डूवाडी, करमाळा, पंढरपूर, करकंब, मंगळवेढा आणि अकलूज या पोलीस ठाण्यांतील एकूण 29 गुन्ह्यांतील मुद्देमालाचा आढावा घेण्यात आला.
कारवाईदरम्यान शासकीय पंचांच्या उपस्थितीत सर्व पदार्थांचे पुन्हा वजन करण्यात आले तसेच रासायनिक तपासणी करून ते गांजा आणि अफू असल्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर हा सर्व मुद्देमाल सोलापूर महानगरपालिकेच्या भोगाव येथील कचरा डेपोतील इन्सिनरेटरमध्ये जाळून नष्ट करण्यात आला.
या कारवाईवेळी पोलिस उपअधीक्षक शिरीष हुंबे, पोलिस निरीक्षक संजय जगताप, वजन मापन निरीक्षक सुधीर खांडेकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अभिजित लोहिया तसेच पुणे येथील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे अधिकारी उपस्थित होते.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड