मधाचे गाव आमझरी-चिखलदरा 'राजमाता जिजाऊ' बस सेवा सुरू करण्याची अमरावती जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
अमरावती, 22 मे (हिं.स.) विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा या प्रसिद्ध पर्यटन स्थळासाठी अमरावतीवरून थेट बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी चिखलदरा स्फुर्ती क्लस्टरचे संचालक सुनील भालेराव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांकडे
मधाचे गाव आमझरी-चिखलदरा 'राजमाता जिजाऊ' बस सेवा सुरू करण्याची अमरावती जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी


अमरावती, 22 मे (हिं.स.)

विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा या प्रसिद्ध पर्यटन स्थळासाठी अमरावतीवरून थेट बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी चिखलदरा स्फुर्ती क्लस्टरचे संचालक सुनील भालेराव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. स्फुर्ती क्लस्टर शहापूर चिखलदरा (हनी अँड खवा मल्टी प्रॉडक्ट प्रोसेसिंग स्फूर्ती क्लस्टर) यांच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात, मागील पाच वर्षांपासून ही महत्त्वाची बस सेवा बंद असल्याने पर्यटक आणि स्थानिक आदिवासी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या संदर्भातील निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC) विभाग नियंत्रकांनाही योग्य त्या कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच स्थानिक खासदार बळवंत वानखेडे यांच्याकडेही साकडे घालण्यात आले असून, त्यांनी या मागणीचे गांभीर्य ओळखून स्वतंत्र पत्रव्यवहाराद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे ही बस सेवा सुरू करण्याची आग्रही शिफारस केली आहे.सध्या अमरावती महसूल विभागीय जिल्हा मुख्यालयातून चिखलदऱ्यासाठी थेट सरकारी बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सद्यस्थितीत यवतमाळवरून येणाऱ्या केवळ एकाच सायंकाळच्या ५ वाजताच्या बसवर पर्यटकांना आणि स्थानिक प्रवाशांना अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे चिखलदऱ्याला जाणाऱ्या पर्यटकांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, जो अत्यंत खर्चिक ठरत आहे. या महागड्या प्रवासामुळे चिखलदरा येथील पर्यटनाला मोठा फटका बसत असून पर्यटकांच्या संख्येत घट होत असल्याचे संचालक सुनील भालेराव व पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि सर्वसामान्य पर्यटकांना विदर्भाच्या नंदनवनाचा आनंद घेता यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यात तातडीने लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे. अमरावती ते चिखलदरा मार्गे मधाचे गाव आमझरी या मार्गावर दररोज किमान दोन इलेक्ट्रिक (E-Bus) आणि एक साधी 'राजमाता जिजाऊ' बस सेवा त्वरित सुरू करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना प्रवासाची सोय होईल आणि मधाचे गाव असलेल्या आमझरीसह परिसरातील स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायात मोठी वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या निवेदनावर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपीलाल धिकार, नंदनवन शहर उपजिविका केंद्र चिखलदरा महिला बचतगटांच्या सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी चिखलदरा स्फुर्ती क्लस्टर द्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी लावून धरली आहे. आता पालकमंत्री, खासदार आणि स्थानिक संघटनांच्या या संयुक्त पाठपुराव्यानंतर प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण चिखलदरावासी व पावसाळी पर्यटकांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande