
सोलापूर, 22 मे (हिं.स.) : जुळे सोलापूर येथे प्रस्तावित नाट्यगृह उभारणीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी शहरातील नाट्य कलाकार, दिग्दर्शक, साऊंड-लाईट तज्ज्ञ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांशी सविस्तर चर्चा केली. कलाकारांनी दिलेल्या सूचनांनुसारच सोलापुरात अत्याधुनिक आणि दर्जेदार नाट्यगृह उभारले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत कलाकारांनी पुणे आणि मुंबई येथील आधुनिक नाट्यगृहांच्या धर्तीवर सोलापुरातही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ध्वनी व प्रकाश व्यवस्था, प्रशस्त आसन क्षमता, डिजिटल तंत्रज्ञान, कलाकारांसाठी स्वतंत्र ग्रीनरूम, सरावासाठी जागा तसेच पार्किंग सुविधा यांसारख्या बाबींवर विशेष चर्चा झाली.बैठकीला महापालिकेचे प्रकाश दिवाणजी, आर्किटेक्ट चिंचोली तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. नाट्यगृहाच्या आराखड्यासह आर्थिक व्यवहार्यता, बांधकाम खर्च आणि भविष्यातील देखभाल याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली. सांस्कृतिक चळवळीला चालना देणारे आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे नाट्यगृह उभारण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.या चर्चासत्राला विजय साळुंखे, जे. पी. कुलकर्णी, अमोल देशमुख, जैद शेख, डॉ. मीरा शेंडगे, शांता येळमकर, नरेंद्र गंभीरे, शिरीष देखणे आणि देवदत्त सिद्धम यांच्यासह विविध कलाकार व तज्ज्ञ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड