
जळगाव, २२ मे (हिं.स.) : गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरातील तापमानाने ४४ ते ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने नागरिक कडक उन्हाळा आणि उकाड्यामुळे त्रस्त झाले आहेत. वाढत्या तापमानावर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच शहरातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने आगामी पावसाळ्यात तब्बल १ लाख वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी संकल्प हाती घेतला आहे.
या उपक्रमाला व्यापक लोकसहभाग मिळावा यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील उद्योजक, व्यापारी आणि सामाजिक संस्थांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.महापौर म्हणाल्या की, “शहरातील वाढते तापमान ही गंभीर बाब बनली आहे. भविष्यातील पर्यावरण संतुलन लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. मनपाने १ लाख झाडे लावण्याचे नियोजन केले असून, या मोहिमेत सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.”महापालिकेकडून वृक्षारोपणासाठी शहरातील मुख्य महामार्ग, साईड रोड तसेच अतिक्रमण हटवलेल्या मोकळ्या जागांची निवड करण्यात येत आहे. विशेषतः महामार्गाच्या मधोमध असलेल्या मोकळ्या पट्ट्यांवर प्राधान्याने वृक्ष लागवड केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
महापौरांनी केवळ वृक्षारोपण न करता झाडांचे संगोपन करण्यावरही भर दिला. त्या म्हणाल्या, “झाडे लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ती जगवणे आणि त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. मनपा प्रशासन झाडे लावेल, मात्र त्यांचे संगोपन करण्यासाठी नागरिकांची साथ अत्यंत गरजेची आहे.”यासाठी शहरातील उद्योजक, व्यापारी, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी झाडे दत्तक घेऊन त्यांच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सामूहिक प्रयत्नांतूनच हवामान बदलावर नियंत्रण मिळवता येईल आणि भविष्यात जळगावचे तापमान कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. “स्वच्छ शहर, हरित शहर आणि सुंदर शहर” घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर