मुंबई मेट्रो अॅक्वा लाईन ३ मध्ये तांत्रिक बिघाड; तब्बल ५० मिनिटे सेवा ठप्प
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण मुंबई, 22 मे (हिं.स.)। मुंबईतील मेट्रो अॅक्वा लाईन ३ वर शुक्रवारी सकाळच्या गर्दीच्या वेळी मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. भुयारी मार्गावर धावणारी मेट्रो जवळपास ४० ते ५० मिनिटे एकाच ठिकाणी थांब
Technical Glitch on Mumbai Metro Aqua Line 3


Technical Glitch on Mumbai Metro Aqua Line 3


प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई, 22 मे (हिं.स.)। मुंबईतील मेट्रो अॅक्वा लाईन ३ वर शुक्रवारी सकाळच्या गर्दीच्या वेळी मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. भुयारी मार्गावर धावणारी मेट्रो जवळपास ४० ते ५० मिनिटे एकाच ठिकाणी थांबून राहिल्याने प्रवाशांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. सकाळच्या कार्यालयीन वेळेत अचानक सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेक चाकरमान्यांना उशिरा पोहोचावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक अडचणीमुळे डाउनलाईन आणि अपलाईन या दोन्ही मार्गांवरील रेल्वे सेवांवर परिणाम झाला. मेट्रो दीर्घकाळ एकाच ठिकाणी उभी राहिल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे अॅक्वा लाईन ३ ही पूर्णपणे भुयारी मार्गाने धावणारी सेवा असल्याने बाहेरील परिस्थिती दिसत नव्हती. त्यातच मोबाइलला नेटवर्क उपलब्ध नसल्याने प्रवाशांना आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधणेही कठीण झाले. संदेश पाठविणे आणि फोन करणे अशक्य झाल्याने अनेक प्रवासी चिंतेत होते.

मेट्रो स्थानकांवरही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांची रांग वाढत गेली. नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला याबाबत सुरुवातीला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम आणि भीती अधिक वाढली. तब्बल ५० मिनिटांनंतर तांत्रिक अडचण दूर करण्यात यश आले आणि मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, त्यानंतरही काही काळ मेट्रो उशिराने धावत होती. अॅक्वा लाईन ३ सुरू झाल्यानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात सेवा विस्कळीत झाल्याची घटना घडल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, मेट्रो प्रशासनाने अधिकृत निवेदन जारी करत तांत्रिक समस्येमुळे सकाळी दोन्ही मार्गांवरील सेवा विलंबाने सुरू असल्याचे सांगितले. ही समस्या आता पूर्णपणे दूर करण्यात आली असून सेवा पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. अॅक्वा लाईन ३ ही थेट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी महत्त्वाची सेवा असल्याने या घटनेची मोठी चर्चा होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande