
ठाणे, 22 मे (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार महिलाध्यक्ष मनिषा भगत यांच्या नेतृत्वाखाली तथा ऋताताई आव्हाड यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध करण्यासाठी लाटणे मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान काढण्यात आलेल्या या मोर्चात मोर्चेकऱ्यांनी मोदी सरकारच्या धोरणांमुळेच महागाई वाढली असल्याचा आरोप करीत जोरदार थाळीनादही केला.
पश्चिम बंगालच्या निवडणुका संपल्यानंतर इंधनाच्या दरात अवघ्या एका आठवड्यात दोन वेळा दरवाढ करण्यात आली आहे. मोदी सरकारने ही दरवाढ आपल्या भांडवलदार मित्रांसाठी केली असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी महिला काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात बहुसंख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चेकरी महिलांनी हातात घेतलेल्य् पोळीपाट, लाटणे थाळी - चमचा यांचा नाद करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. बहुत हुई महंगाई की मार, नही चाहिऐ मोदी सरकार; वाह रे मोदी तेरा खेल, सस्ता बेवडा मेहंगा तेल; या सरकारचे करायचे काय, खालती डोके वरती पाय; मोदी सरकार हाय - हाय, जनता भरतेय महागाईचे बिल, मोदी करतात मेलोडीचे डील अशा घोषणा या मोर्चेकऱ्यांनी दिल्या. तसेच, यावेळी मेलोडी चाॅकलेटचे वाटपही करण्यात आले.
यावेळी ऋताताई आव्हाड म्हणाल्या की, महागाईचा आगडोंब उसळला आहे. महागाईचा सर्वाधिक चटका महिलांना सोसावा लागतो. त्यामुळेच आम्हा महिलांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. आज जे कोणी काटकसरीबद्दल बोलत आहेत; त्यांनी ते न बोललेच बरे! आज देशातील तरूणांना काॅक्रोच म्हटले जात आहे. पण, हे लक्षात ठेवा की हिरोशिमा - नागासाकीच्या अणूबाँब स्फोटातही फक्त झुरळच वाचले होते. हे झुरळ तुम्हा सर्वांना संपवतील पण ते संपणार नाहीत. काॅक्रोच पार्टीच्या ट्वीटर अकाउंट बंदीबाबत त्यांनी, तुम्ही बॅन बॅन करीत रहा आम्ही एक दिवस तुमचा बँड वाजवू, असा मिश्कील टोलाही लगावला. महिलाध्यक्ष मनिषा भगत यांनी, तेलाच्या किमती वाढल्या आहेत. गहू, तांदूळ, डाळी, तेल यांचे दर गगनाला भिडले आहेत. सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांची सबसिडी काढली जात आहे. त्याविरुद्ध या मोर्चातून सामान्य महिलांनी आक्रोश केला आहे. आम्ही सामान्य जनतेला मोर्चात सहभागी होऊन आपल्या अधिकारांसाठी लढण्याचे आवाहन केले होते. या मोर्चात जे लोक सहभागी झाले आहेत. त्यामध्ये महिलाच अधिक आहेत. या सर्व महिला सर्वसामान्य , गोरगरीब घरातील आहेत. त्या स्वयंस्फूर्तीने आल्या आहेत. यावरूनच या सरकारविरोधात किती रोष आहे, हे दिसून येत आहे. अशीच महागाई वाढत असेल तर गरीब घरातील लोक उपाशी राहून मरतील. उपाशी मारण्यापेक्षा मोदी सरकारने गोरगरीब जनतेला गोळ्या घालाव्यात; असेच म्हणावेसे वाटते. या सरकारने लाडकी बहिण म्हणत 1500 रूपयांची रेवडी दिली अन् महागाई वाढवून बहिणीला रडवली. बहिणींचा हा तळतळाट सरकारला भोगावा लागेल, असे म्हणाल्या.
नगरसेविका पल्लवी जगताप यांनी, निवडणुका संपल्यानंतर लागलीच इंधनाचे दर वाढविले आहेत. म्हणजेच, निवडणुका जिंकल्या की लोक जगोत अथवा मरोत, आपणाला काय करायचे? अशीच भूमिका मोदी आणि त्यांच्या सरकारची आहे. आज गोरगरीब लोकांना दोनवेळचे अन्न कसे मिळवायची याची भ्रांत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तेल खाऊ नका, इंधन वापरू नका, परदेशी प्रवास करू नका, असे आवाहन करीत आहेत. तर दुसरीकडे स्वतः पाच देशांचे दौरे करीत आहेत. लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अशीच गत आहे. त्यामुळेच महागाई रोखण्यात अपयशी ठरलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तर, मर्जिया पठाण यांनी, महागाईचा सर्वाधिक त्रास हा महिलांना सहन करावा लागत आहे. महिलांना स्वयंपाकघर सांभाळणे आता जड जात आहे. आपली मुलगी, आपली बहिण असा नारा देणाऱ्या या सरकारला महिलांच्या दुःखाची कल्पनाच नाही. स्वतः कोट्यवधींची उड्डाणे घ्यायची आणि जनतेला गरिबीत टाकायचे धोरण आम्ही सहन करणार नाही, असा इशारा दिला.
या आंदोलनात महिला कार्याध्यक्ष फुलबानो पटेल, नगरसेविका पल्लवी जगताप, मर्जिया पठाण, शशिकला पुजारी, माधुरी सोनार, कमरजा मुलानी, मनिषा पाटील, ज्योती निंबर्गी, रुबीना शेख, रेश्मा भानुशाली , सपना पाटील , मेघा गवते, शायना अजमी, नूर अहमदी , पूजा शिंदे, दीपा गावंड , कल्पना नार्वेकर , साकिबा शेख , फातमा सय्यद, नेहा चव्हाण आदी सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर