
जलसाठा टिकला तरच खरीपाला दिलासा
अमरावती, 22 मे (हिं.स.)
जिल्ह्यातील पाणीसाठा लक्षात घेता सिंचन प्रकल्पातही गतवर्षीचा काही पाणीसाठा शिल्लक असल्याने यावर्षी सिंचनासाठी व पुरवठ्यासाठी मुबलक साठा निर्माण होण्याचा अंदाज आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत ४२.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात जिल्ह्यातील या ५६ प्रकल्पातूनच पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येणार असल्याचे सध्याचे चित्र दिसून येत आहे..
अमरावती जिल्ह्यात अप्पर वर्धा या मोठ्या धरणांत सध्या २६५.०५ दशलक्ष घनमीटर (टीएमसी) जलसाठा शिल्लक असून तो एकूण जलसंचय क्षमतेच्या ४४.९९ टक्के आहे. या धरणातून अमरावती शहरासह ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच एकूण सात मध्यम प्रकल्प असून त्यातील शहानूरमध्ये १९.१६ दशलक्ष घनमीटर, चंद्रभागामध्ये ३२.९६ दशलक्ष घनमीटर, पूर्णा प्रकल्पांत २२.६० दशलक्ष घनमीटर, सपनमध्ये १७.४८ दशलक्ष घनमीटर, पंढरीमध्ये १२.५० दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. सर्व मध्यम प्रकल्प मिळून १०५.०३ दशलक्ष घनमीटर जलसाठा असून एकूण जलसंचय क्षमतेच्या तो ४०.९९ टक्के आहे. ४८ लघू प्रकल्पांत ४४१.५८ दशलक्ष घनमीटर साठा आहे. दरम्यान जलसंपदा विभागाने खबरदारीचे उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. आणखी महीनाभर पाणी पुरवण्याचे आव्हान समोर असून प्रत्यक्ष धरणक्षेत्रात पावसाला सुरुवात झाल्यानंतरच जलसाठ्यात वाढ होणार आहे.
---------------------------------------------------
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी