
सिन्नर, 22 मे (हिं.स.) : तालुक्यातील बोरखिंड येथील सोनार खोरा परिसरात गुरुवारी सकाळी बिबट्याने तासाभराच्या अंतरात दोन जणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात पांडुरंग लक्ष्मण निरगुडे (40) आणि सुभाष कचरू फोडसे (26) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग निरगुडे हे सकाळी सुमारे सातच्या सुमारास घराजवळील शेतात जनावरांसाठी चारा कापत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याने त्यांचा मान पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी उजव्या हाताने प्रतिकार केला. या झटापटीत त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर वनविभागाचे कर्मचारी रामदास हरळे यांनी त्यांना तत्काळ बिटको रुग्णालयात दाखल केले.
पहिल्या हल्ल्यानंतर बिबट्या जवळील जांभळीच्या सुमारे 50 ते 60 फूट उंच झाडावर जाऊन बसला होता. दरम्यान, जखमी निरगुडे यांची विचारपूस करण्यासाठी आलेले त्यांचे भाचे-जावई सुभाष फोडसे अंगणात उभे असताना बिबट्याने झाडावरून खाली उतरून त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने पाठीमागून पंजा मारल्याने त्यांचा शर्ट फाटला आणि त्यांनी धाडसाने प्रतिकार करून बिबट्याला परतवून लावले. या झटापटीत फोडसे यांनाही उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.
-------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV