
पुणे, 22 मे (हिं.स.)।
विकास लवांडे यांच्या अटकेनंतर पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी बाब समोर आली आहे. लवांडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना पोलिसांनी न्यायालयात त्यांनी न केलेला गुन्हा त्यांच्या नावावर दाखवल्याचे उघड झाले असून, नंतर रिमांड रिपोर्टमध्ये हा प्रकार ‘नजरचुकीने’ घडल्याचे पोलिसांनी मान्य केले आहे.
लवांडे यांच्याविरोधात ८ मे रोजी वाघोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जाला विरोध करताना पोलिसांनी लवांडे यांच्या कथित गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती न्यायालयात सादर केली.
यामध्ये २०१७ साली बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल असल्याचा दावा करण्यात आला. प्रत्यक्षात, नथुराम गोडसेविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी लवांडे यांच्यावर गुन्हा क्रमांक ३२/१७ दाखल झाला होता, जो २०२२ मध्ये शासनाने मागे घेतला होता. मात्र, पोलिसांनी न्यायालयात चुकून ३३/१७ हा गुन्हा नमूद केला. हा गुन्हा ‘गौतम कांबळे’ नावाच्या व्यक्तीवर दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी दाखल होता. विशेष म्हणजे त्या प्रकरणातून कांबळे यांचीही निर्दोष मुक्तता झाली होती.
या प्रकारामुळे पुणे पोलिसांच्या कार्यशैलीवर टीका होत असून, विरोधकांनी यामागे जाणीवपूर्वक कारस्थान असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, विकास लवांडे हे वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सोशल मीडियावर काही वारकऱ्यांची यादी प्रसिद्ध करत ‘वारकरी संप्रदायात काही लोकांची घुसखोरी झाली आहे’ असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांच्यावर तीव्र टीका झाली होती. काही दिवसांपूर्वी पुण्यात त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली होती. या घटनेनंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा दुग्धाभिषेक केला होता.
अटकेनंतर लवांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पुणे पोलिसांवर निशाणा साधला. “चोर सोडून संन्याशाला फाशी” अशी टीका करत, “माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी मोकाट आहेत, मात्र कोणताही ठोस पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी पोलिस रात्री घरी आले,” असा आरोप त्यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु